08 July 2020

News Flash

नाशिक ते पंढरपूर सायकल वारी ‘लिम्का बुक..’मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील

यंदा सायकल वारीचा कार्यक्रम आठ ते १० जुलै असा तीन दिवसांचा आहे.

नाशिक सायकलिस्टतर्फे पेपर वितरकांसाठी ‘सायकल राजा’ स्पर्धा

सुमारे पाच वर्षांपूर्वी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने आषाढीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘नाशिक ते पंढरपूर’ सायकल वारीची नोंद ‘लिम्का बूक.’ मध्ये करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या वर्षी अवघ्या सात जणांसह सुरू करण्यात आलेल्या पंढरपूर सायकल वारीस प्रत्येक वर्षी उत्तम प्रतिसाद मिळत असून यंदा ही संख्या साडेतीनशेपेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. फाऊंडेशनने २० मे रोजी पेपर वितरकांसाठी ‘सायकल राजा’ तसेच जूनमध्ये ‘नाशिक सायकलिस्ट रेन्डॉनर्स मायलर्स’ या दोन स्पर्धाचे आयोजन केले आहे.

नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांनी ही माहिती दिली. नाशिक सायकलिस्टच्या विविध उपक्रमांमुळे नाशिककरांमध्ये सायकलीचा वापर वाढला असून सायकल वापरण्याने होणारे शारीरिक तसेच पर्यावरणीय फायदेही त्यांना अवगत झाले आहेत. नाशिक सायकलिस्टचे संस्थापक सदस्य हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त सायकलवरून नाशिक ते पंढरपूर अशी वारी करण्याचे ठरले. पहिल्या वर्षी अवघ्या सात जणांनी या सायकल वारीत सहभाग घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी ही संख्या वाढतच गेली. मागील वर्षी २२५ जणांनी सायकलवरून पंढरीची वारी केली. विशेष म्हणजे त्यात ५० महिलांचा सहभाग होता. यंदा महिलांची संख्या शंभरवर जाण्याची शक्यता बिरदी यांनी व्यक्त केली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी वेळ जाऊ नये म्हणून सायकलिस्टतर्फे ३०० जणांची ऑनलाईन नोंदणीचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा सायकल वारीचा कार्यक्रम आठ ते १० जुलै असा तीन दिवसांचा आहे. आठ जुलै रोजी सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब मैदानापासून सायकलस्वार पंढरपूरकडे रवाना होतील. सिन्नर-नानज-राहुरी-नगर असा १५० किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर नगरला पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी रूई छत्तीसी-करमाळा-टेंभूर्णी या १५० किलोमीटरच्या प्रवासानंतर टेंभूर्णी येथे दुसरा मुक्काम होईल. त्यानंतर थेट पंढरपूर गाठले जाईल. परतीच्या मार्गात सर्व सायकली ट्रकमधून परत आणण्यात येतील, अशी माहिती मिलिंद धोपावकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. महाजन बंधू या वारीचे नियोजन करणार आहेत.

नाशिक सायकलिस्टने सिंघ क्रशर्स लिमिटेड, लुथरा एजन्सी आणि नाशिक वृत्तपत्र वितरण संघटना यांच्या वतीने दररोज भल्या पहाटे घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम करणाऱ्या मुलांसाठी तसेच पेपर वितरकांसाठी २० मे रोजी सायंकाळी चार वाजता ‘पेपर वितरकांचा सायकल राजा’ ही स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रूपये तीन हजार, दोन हजार आणि एक हजार याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या पहिल्या १०० स्पर्धकांना टोपी भेट दिली जाणार आहे. याशिवाय जूनमध्ये ७० किलोमीटर आणि १४० किलोमीटर या दोन गटात अधिक अंतराच्या सायकल स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून उपक्रम घेतला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सायकल स्पर्धाच्या क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी नाशिक सायकलिस्टचे पथक युरोपातही जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाशिक सायकलिस्टने सभासद नोंदणी तसेच सायकलींग क्रीडा प्रकारात पुढे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नर्चर टॅलंट’ या उपक्रमात मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८८०५७०११४२, ९९२३०९११०८ या क्रमांकांवर संपर्क साधावा. यावेळी डॉ. मनिषा रौंदळ, दिगंबर लांडे हेही उपस्थित होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 3:15 am

Web Title: 200 nashik residents cycle to pandharpur
टॅग Pandharpur
Next Stories
1 कांदा दरवाढीसाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
2 सिडकोतील खून प्रकरणी पाच संशयितांना पोलीस कोठडी
3 अनाकलनीय सूचनांमुळे ‘आयआयटी’ पूर्वपरीक्षार्थी संभ्रमित
Just Now!
X