नातेवाईकांचा संताप, महापालिका रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरुप

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायूच्या टाकीतील गळतीमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत रुग्णालयातील २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. हा  धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बुधवारी घडला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरावर शोककळा पसरली असून सर्वजण सुन्न झाले आहेत.

दीड महिन्यांपूर्वी रुग्णालयात प्राणवायूची साठवणूक करण्यासाठी १३ केएल क्षमतेची टाकी कार्यान्वित केली गेली होती. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार नोझल, व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने ही गळती झाल्याचा अंदाज आहे.

या घटनेनंतर रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण, या रुग्णाच्या  नातेवाईकांचा आक्रोश, अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी  आरोग्य कर्मचाऱ्यांची धडपड आणि या दूर्घटनेनंतर रुग्णालयाला राजकीय नेत्यांच्या एकापाठोपाठ एक भेटी यामुळे येथे कमालीच्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

गळतीमुळे टाकीतील प्राणवायू संपुष्टात आल्याचे लक्षात आल्यावर क्षणाचाही विलंब न करता नातेवाईकांनी तिसऱ्या मजल्यावरील करोना कक्षात धाव घेतली. रुग्णांना वाचविण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अनुसरले. अत्यवस्थ रुग्णांना खांद्यावरून खाली आणले जाऊ लागले. रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता काहींना मिळेल त्या वाहनाने अन्यत्र नेण्यात आले. रुग्णांसह नातेवाईकांची अस्वस्थता मन हेलावणारी होती. अकस्मात ओढवलेल्या संकटाने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका खचल्या. माहिती मिळताच अन्य नातेवाईक रुग्णालयात धडकू लागले. जिल्हा रुग्णालयाने तातडीने प्राणवायूचे सिलेंडर पाठविले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. नातेवाईकांमध्ये रोष पसरला. कायदा, सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने रुग्णालय परिसरास अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

रुग्णालयात  प्राणवायू व्यवस्थेवर १३१ तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. आता काय करावे हे कुणाला सूचत नव्हते. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर काही रुग्णांचे नातेवाईक करोना कक्षाकडे धावले. रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अस्वस्थ रुग्णांचे पोट, छाती दाबून प्राणवायू देण्याची धडपड करणे सुरू झाले. बिकट स्थिती पाहून काहींनी रुग्णांना थेट दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा, खासगी वाहनातून काही जणांना नेण्यात आले. ज्यांचे नातेवाईक रुग्णालय परिसरात नव्हते, त्यातील काही जणांकडे पाहायला कुणी नव्हते. काही वेळाने पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात येण्यास सुरुवात झाली. अन्य रुग्णांचे नातेवाईक जमू लागले. तासाभरात जिल्हा रुग्णालयाकडून प्राणवायूचे सिलिंडर या ठिकाणी पोहचले. ज्या रुग्णांना ते देणे शक्य होते, त्यांना त्याद्वारे प्राणवायूचा पुरवठा करण्यात

आला.

जवळपास अर्धा ते पाऊण तासात प्राणवायूअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. नातेवाईक संतप्त झाले. उपचारानंतर बरे होऊ लागलेले रुग्णही प्राणवायूअभावी मरण पावल्याची भावना व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली. रुग्णालयाबाहेर संतप्त नातेवाईकांची गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन काही वेळात मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयात दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली.  अकस्मात घडलेल्या या घटनेने रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांनाही धक्का बसला. त्यावेळी नेमके काय घडले, या प्रश्नावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

 

मृतांची नावे

*   अमरदीप नगराळे (७४)

*  भारती निकम (४४)

*  श्रावण पाटील (६७)

*  मोहन खैरनार (६०)

*  मंशी शहा (३६)

*  पंढरीनाथ नेरकर (३७)

*  सुनील जाळके  (३३)

*  सलमा शेख (५९)

*  प्रमोद वालुकर (४५)

*  आशा शर्मा (४५)

*  भय्या सय्यद (४५)

*  प्रवीण महाले (३४)

*  सुंगधाबाई थोरात (६५)

*  हरणाबाई त्रिभुवन (६५)

*  रजनी काळे (६१)

*  गीता वाघचौरे (५०)

*  बापूसाहेब घाटेकर (६१)

*  वत्सलाबाई सूर्यवंशी (७०)

*  नारायण इर्णक (७३)

*  संदिप लोखंडे (३७)

*  बुधा गोतरणे (६९)

*  वैशाली राऊत (४६)

हे सर्वजण नाशिक शहर परिसरातील रहिवासी होते.