शहराबरोबर ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत वाढ

नाशिक : शहराबरोबर ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या वाढत असून जिल्ह्य़ातील आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा २२ हजारांच्या टप्प्याकडे मार्गक्रमण करत आहे. यातील जवळपास १६ हजार रुग्ण बरे झाले, तर ६३२ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत चार हजार ६३१ रुग्ण उपचार घेत आहेत. यात ग्रामीण भागातील ११३६ तर शहरातील तीन हजार १९४ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित मालेगाव शहर आणि जिल्ह्य़ाबाहेरील आहेत.

नाशिक शहरात प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्णांना शोधण्यात गती मिळाली आहे. महापालिका, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आदींच्या सहकार्याने विविध भागात सुरू असणाऱ्या प्रतिजन चाचण्यांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. पालिकेच्या अहवालानुसार ताप, खोकला असणाऱ्या आतापर्यंत ३५ हजार ७४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील २९ हजार ९० जणांचे नमुने घेतले गेले. यात ४७४५ जणांचे अहवाल सकारात्मक आढळले. महापालिका, खासगी रुग्णालयांचे मिळून ४३८ अहवाल प्रलंबित आहेत.

शहरात आतापर्यंत १४ हजार ३१७ बाधितांनी उपचार घेतले. त्यातील १० हजार ८१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. ३६२ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेने आतापर्यंत ६७ हजारहून अधिक जणांचे नमुने तपासले. त्यातील ५० हजार ५७३ जणांचे नमुने नकारात्मक आले. रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांचा आलेखही उंचावत आहे. सद्यस्थितीत ११७६ प्रतिबंधित क्षेत्र असून ते सर्व इमारतीतील क्षेत्र असल्याचे महापालिकेने अहवालात म्हटले आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. सध्या ग्रामीण भागात नाशिक तालुका २८९, चांदवड ४१, सिन्नर २२७, दिंडोरी ४६, निफाड २०२, देवळा ३५, नांदगांव ७४, येवला आठ, त्र्यंबकेश्वर सात, सुरगाणा १०, कळवण चार, बागलाण ६५, इगतपुरी २९, मालेगाव ग्रामीण ९९ असे एकूण ११३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार १९४, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ३९२  तर जिल्ह्यबाहेरील नऊ असे रुग्ण उपचार घेत असल्याचे जिल्हा रुग्णालयाने म्हटले आहे.

करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. नाशिक ग्रामीण १५७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३६२, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील ९२ आणि जिल्ह्य़ाबाहेरील २१ अशा एकूण ६३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७५.२६ इतकी आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ७३.८४,  नाशिक शहरात ७५.५१, मालेगाव ७६.३५  टक्के तर जिल्हा बाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.६१  टक्के आहे.