शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत शिपाई पदासाठी पोलीस भरती प्रक्रियेला रणरणत्या उन्हात मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ५०० पैकी २२५ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. १७६ उमेदवारांनी दांडी मारली, तर ९९ जण शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीत अपात्र ठरले.

पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ३१ पोलीस शिपाई पदासाठी तब्बल चार हजार ११६ अर्ज आले आहेत. पोलीस कवायत मैदानावर त्यास सुरुवात झाली. शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणीसाठी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२४ उमेदवार उपस्थित राहिले. शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत ९९ उमेदवार अपात्र ठरले असून मैदानी चाचणीसाठी २२५ उमेदवार पात्र ठरल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त गुलाबराव चौधरी यांनी दिली. भरती प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भरती प्रक्रियेंतर्गत ५ एप्रिलपर्यंत ३ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज सकाळी सहा ते १० आणि दुपारी चार ते सात या वेळेत धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी टाकळी रोड ते निलगिरी बाग या मार्गावरील वाहतूक निर्धारित वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

टाकळी रस्त्यावरील अनुसया नगरपासून-तिरुपती नगर-एसटीपी फिल्टरेशन प्लान्ट-जेजूरकर मळा-गीताई लॉन्स-साईलीला लॉन्स-मंगलदीप स्वीट-निलगिरी बाग या मार्गावर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. यादरम्यान हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी ३ एप्रिल रोजी मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील. नमूद मार्गावर मंगल कार्यालय तसेच लॉन्स येथे लग्न समारंभ असल्यास लग्नासाठी येणाऱ्यांना वरील र्निबध लागू राहणार नाहीत. या कालावधीत वाहनचालकांनी दिलेल्या वेळेत टाकळी गाव संगम घाट ते मिर्ची ढाबा या पर्यायी मार्गाचा वाहतुकीसाठी अवलंब करावा. हे सर्व प्रकारचे र्निबध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागू राहणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.