स्मार्ट सिटी विकास प्राधिकरण बैठक

शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या काठांना नवीन साज चढविण्यासाठी विविध १८ कामांचा अंतर्भाव असणाऱ्या गोदा प्रकल्पाच्या २३० कोटी रुपयांच्या आराखडय़ास गुरुवारी नाशिक महापालिका स्मार्ट सिटी विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कामांच्या यादीवर नजर टाकल्यास मनसेने गोदावरीच्या सुशोभीकरणासाठी मांडलेल्या संकल्पनांशी त्या मिळत्याजुळत्या असल्याचे दिसून येते.

स्मार्ट सिटीअंतर्गत कंपनीची पाचवी बैठक गुरूवारी कंपनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी गोदा प्रकल्पाचा विशेष आराखडा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन १८ कामांना मान्यता देण्यात आली.

यावेळी ‘सोलर रुफ टॉफ’ प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या अंतर्गत महापालिकेचे पंचवटी विभागीय कार्यालय, इंदिरा गांधी रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, महात्मा फुले कला दालन, महाकवी कालिदास कला मंदिर आणि पंचवटीतील महापालिकेची ज्ञानेश्वर अभ्यासिका या इमारतींमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. त्याकरिता पावणे दोन कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ किलोमीटर लांबीचा स्मार्ट रोड साकारण्यात येणार आहे. स्मार्ट रोड अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका असे न करता तो मुंबई नाक्यापर्यंत करावा, अशी मागणी भाजपच्या आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी केली होती. परंतु, मुंबई नाक्यापुढील भाग स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट नसल्याचे कारण देऊन त्यांची मागणी अमान्य करत आधीच्या प्राकलनास मान्यता देण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये विद्युत दाहिनी बसविली जाणार असून त्याच्या दोन कोटी ३२ लाख रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीचे स्वत:चे पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपही विकसित केले जाणार आहे. त्यालाही मान्यता देण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यालय पंचवटी विभागीय कार्यालयात स्थलांतरीत करण्यास बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. साडे तीनशे चौरस मीटरमध्ये हे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. बैठकीस उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती दिनकर पाटील, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

४१ ठिकाणी स्मार्ट वाहनतळ

शहरातील रस्ते वाहतूक कोंडीत सापडले आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी शहरात ४१ ठिकाणी स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन प्रणालीला मान्यता देण्यात आली. त्यात ३४ ठिकाणी रस्त्यालगत तर सात ठिकाणी इतर ठिकाणी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. प्रमुख मार्गावर वाहनतळाचा प्रश्न दिवसागणिक बिकट होत आहे. अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेक इमारतींनी वाहनतळाच्या जागेत अतिक्रमण केल्याने रस्त्यांलगत वाहने उभी केली जातात. या प्रश्नावर स्मार्ट वाहनतळांच्या माध्यमातून काही अंशी तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत कामे

गोदा काठावर पहिल्या टप्प्यात रेट्रोफिटिंगची कामे सुरू करण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर ५.५२ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक, प्राचीन कुंड पुनर्जीवित करणे, वृक्ष लागवड, पुलांची बांधणी, दगडांच्या सहाय्याने गोदाकाठ सजावट, वाघाडीच्या पात्राचे विस्तारीकरण, चिंचबन ते गंगावाडी पादचारी पूल, सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण, तरंगता संगीतमय कारंजा आदी कामे करण्यात येणार आहेत.