करोना संकटातील मरगळ झटकत अभिनयातील आनंद शोधण्याचा प्रयत्न

नाशिक : सध्या करोनामुळे अर्थचक्राचा गाडा रुतल्याने याचा फटका सर्वाना बसला. कला, संस्कृती, खेळ अशा वेगवेगळ्या माध्यमांना एक प्रकारची मरगळ आली आहे. ही मरगळ झटकत कला-अभिनयातील आनंद शोधण्याचा प्रयत्न कलाप्रेमी २४ वर्षांच्या युवकाने केला आहे.  टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना वापरत त्याने स्वतच्या गच्चीवर तयार केलेल्या ‘थिएटर’मुळे कलाप्रेमींना हक्काचा खुला रंगमंच मिळाला आहे.

मार्च महिन्यात लागलेल्या टाळेबंदीमुळे मिळेल त्या वाटेने, माध्यमाने बाहेर पडलेली मंडळी आपल्या हक्काच्या घरात विसावली. येथील प्रथमेश जाधव त्यातील एक. मुंबई येथे आपले नशीब अजमावण्यासाठी गेलेला प्रथमेश सध्या ‘कापूस कोंडय़ाची गोष्ट’मध्ये अतुल परचुरे यांच्या सोबत काम करत आहे. व्यावसायिक रंगभूमीवर त्याचे दमदार काम सुरू असताना करोनामुळे त्याला घरची वाट धरावी लागली. मुळात मुंबईत तीन वर्षे काम केल्यानंतर अचानक नाशिकला घरी आल्यावर आलेले रिकामपण त्याला जड झाले. काही तरी करण्याचा शोध घेत असताना त्याला आपल्या वयातील मुलांमधील ऊर्जा, काम करण्याची ऊर्मी लक्षात आली. प्रथमेशने आई-वडिलांशी चर्चा करत ॠषिकेश जाधव, मनोज खैरनार, रवी शेवंत यांच्या मदतीने स्वतच्या बंगल्यावरील गच्चीत रंगमंच उभा करण्याचे ठरवले. आई-वडिलांनी परवानगी दिल्यानंतर टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचा वापर करत त्याने कामास सुरुवात केली.

याविषयी प्रथमेशने आपली भूमिका मांडली. सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटते, तेव्हाच कुठला तरी पर्याय आपल्यासाठी खुला असतो. करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात माझ्या बाबतीत असेच झाले. सतत नाटय़गृहात असल्यामुळे शिट्टय़ा, प्रेक्षकांचा आवाज असे वातावरण सरावाचे झाले होते.

ही कामातील ऊर्जा सतत सोबत राहावी यासाठी घरात बाजूला पडलेल्या बांबूचा वापर करत रंगमंच  उभारला आहे. तीन  महिन्यांत नाशिकमधील नवोदित रंगकर्मीसह काहींनी गीत गायन, वाद्य वादन, एकल अभिनय सादर केला आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने वारा, पाऊस याचा विचार करता रंगमंच कलाप्रेमींसाठी खुला आहे. इच्छुकांनी ९८९०३७०२७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रथमेशने केले आहे.

टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेचा वापर

प्रथमेश जाधवने टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना वापरून घरात बाजूला पडलेल्या बांबूचा वापर करत रंगमंच  उभारला आहे. सहकारी प्रशांत केळकर यांनी पडदे दिले. नाटकासाठी लागणाऱ्या विंग हाताने घरी तयार केल्या. रंगभूमीची अनुभूती यावी यासाठी रंगकामही केले.  नाटय़गृहासाठी लागणारे दिवे बनविण्याकरिता त्याने धान्य वजनासाठी घरात असलेले माप घेत त्यात २०० व्ॉटचा दिवा लावला. पंख्याचा वारा कमी-जास्त करण्यासाठी वापरण्यात येणारे होल्डर, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत प्रकाशयोजना तयार केली. मोजके साहित्य वापरत ग्रीन रूम तयार केली. त्या ठिकाणाहून रंगमंचापर्यंत सहज वावर राहील अशी व्यवस्था प्रथमेशने केली आहे.