भगवान ऋषभदेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची माहिती; हेलिकॉप्टरमधून १०८ फुटी मूर्तीचे दर्शन
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक लढाई याच भागात झाली. भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाने ४० कोटीची विकास कामे तातडीने हाती घेतली असून मांगीतुंगी परिसराच्या विकासासाठी २७५ कोटींचा बृहत् आराखडा तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मांगीतुंगी येथे १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. राजेंद्र पटणी व दीपिका चव्हाण, ज्ञानमती माताजी, रवींद्रकीर्ती स्वामी, अनेकांत महाराज आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जैन समाजातील सर्व र्तीथकरांसह भगवान ऋषभदेव यांचे कार्य मोलाचे असल्याचे नमूद केले. भगवान ऋषभदेव यांनी सर्वाना विकासाची समान संधी दिली. त्यांचे कार्य देशातील सर्व शासकांना मार्गदर्शक आहे. मांगीतुंगी परिसराच्या विकासासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे. या भागाच्या विकासासाठी सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जैन समाजाने भौतिक विकासाबरोबर दातृत्वाला महत्त्व दिले. श्रद्धा असलेल्या समाजाचे अस्तित्व कोणी नष्ट करू शकत नाही. जगातील अनेक संस्कृती नष्ट पावल्या. मात्र, भारतीय संस्कृतीने श्रद्धेला महत्त्व दिल्याने तिचा सातत्याने उत्कर्ष झाला. जैन, बौद्ध, हिंदू धर्माने पर्यावरण आणि अहिंसेसोबत जगण्याचा मार्ग दाखविला. या संस्कृतीने जगाच्या रचनेला समजून घेण्याचे संस्कार केल्याने ती कायम आहे. कालबाह्य ठरणाऱ्या प्रथांना आपल्या संस्कृतीने बाजूला सारले. हाच सांस्कृतिक विकासाचा खरा मार्ग असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भयाळे येथील शहीद जवान शंकर शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुंडे यांनी अहिंसेचा संदेश देऊन जैन समाजाने सांस्कृतिक मूल्यांची सर्वोच्च प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले. भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती त्याचे प्रतीक आहे. जैन साधू कठोर तपश्चर्या करताना समाजाच्या हितासाठी उपदेश देतात. मांगीतुंगी येथून हा संदेश जगभर जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्राम विकास विभागातर्फे १९ कोटींच्या पायाभूत सुविधा पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मांगीतुंगी सोहळ्याच्या विकासाचे कार्य वेगाने करण्यात आल्याचे सांगितले तर भामरे यांनी मांगीतुंगीचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीचे शिल्पकार सी. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांचेही हवाई दर्शन
सुरक्षिततेच्या कारणास्तव मांगीतुंगी येथील डोंगरात साकारलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या भव्य मूर्तीचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हवाई दर्शन घेण्यावर समाधान मानावे लागले. या मूर्तीकडे जाणारा घाटमार्ग विहित निकषाप्रमाणे नसल्याने अतिविशेष व्यक्तींना जाऊ देण्यास सुरक्षा यंत्रणा तयार नाहीत. वाहनाने जाऊनही मूर्तीजवळ पोहोचण्यास १५० पायऱ्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही हेलिकॉप्टरमधून मूर्तीचे दर्शन घेतले.

ऋषभदेवाची आज विश्वविक्रमी महाआरती
भगवान ऋषभदेवाचे मोक्ष कल्याणक झाल्यानंतर या मूर्तीला देवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यानंतर या उंच मूर्तीची आरती विश्वविक्रमाने व्हावी आणि त्याद्वारे आदिवासी भागात उजेड व्हावा आणि जगाचे याकडे लक्ष जाऊन या परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने बुधवारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी पाच हजार भाविक एकत्र येऊन ही महाआरती करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना सुवर्णा काळे व पारस लोहाडे यांची असून बुधवारी सायंकाळी सात वाजता मुख्य सभा मंडपासमोर ही महाआरती होईल. या उपक्रमाची ‘अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. त्याचे निरीक्षण नोंदविण्यासाठी अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती या वेळी आयोजकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.