News Flash

सय्यद वस्तीमध्येही आता साक्षरतेचा श्रीगणेशा

स्वच्छतेचा मूलमंत्र देत त्यांना शरीर तसेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याची शिकवण देण्यात आली.

सक्षमीकरणाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे कितीही म्हटले तरी आजही अंधश्रध्दा, धार्मिक भावना यामुळे कित्येक बालके शिक्षणापासून वंचित आहेत. याची अनुभूती घ्यायची असेल तर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठरोड कालव्या लगतच्या ‘सय्यद वस्ती’ परिसरात डोकावल्यास लक्षात येते. या वस्तीतील ३०९ बालके शिक्षणापासून वंचित आहे. ही बाब समोर आल्यानंतर त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळ, चाकं शिक्षणाची यांनी पुढाकार घेत या वस्तीत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर या बालकांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा श्रीगणेशा होईल अशी अपेक्षा आहे.

पेठ रोडवरील कालव्याला लागून सय्यद वस्ती आहे. वस्तीतील गृहिणी बुरख्यात राहणे, धार्मिक नियमांचे काटेकोर पालन करणे याला प्राधान्य देतात. मुलींसाठीही तेच नियम. सय्यद मंडळी आधी चित्रपट सृष्टीत स्टंटबाजी, साहसी खेळांचे काम करीत असे. मात्र बदलत्या तंत्रज्ञानाचा फटका त्यांना बसल्याने ही मंडळी चित्रपट सृष्टीतून बाहेर पडली. नवीन काही व्यवसाय म्हणून पुरूष मंडळी फेटे बांधणे, बाजार समितीच्या आवारात भाजीपाला विकणे या व्यवसायाकडे वळली. धार्मिकतेचा पगडा असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असले तरी आर्थिक आत्मनिर्भरता आहे. येथील लोकांच्या कित्येक पिढय़ांना शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणाशी संबंध नसल्याने आपल्या मुलांनीही आपल्या सारखाच पारंपरिक व्यवसाय पुढे न्यावा ही त्यांची इच्छा.

तसेच, सय्यद समाज शिक्षण तसेच वैद्यकीय सेवा सुविधा नाकारत आहे. धार्मिक शिकवणी तसेच काही समजुतींमुळे या ठिकाणी कोणीच आजपर्यंत लसीकरण वा औषधे घेतलेली नाहीत. मुलींचे विवाह पाळण्यात ठरतात आणि १३ व्या वर्षी ती मुलगी सासरी जाते. वयाच्या १७ व्या वर्षांपर्यंत ती ‘आई’ होते. हे चक्र भेदण्यासाठी चाकं शिक्षणाची संस्थेने पुढाकार घेतला. गेल्या सहा महिन्यापासून नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या सहकार्याने त्यांचे काम तिथे सुरू आहे. वस्तीतील लोकांचा विश्वास संपादन करण्यात संस्थेचा वेळ गेला. मात्र तेथील गुलाबभाई यांनी सहकार्य केले. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी तसेच त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटावे यासाठी गाणी, गप्पा, गोष्टी या मनोरंजन पध्दतीने शिकण्यास सुरूवात झाली. स्वच्छतेचा मूलमंत्र देत त्यांना शरीर तसेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याची शिकवण देण्यात आली.

या मुलांची आकलन शक्ती प्रचंड असून नवीन काही आत्मसात करण्याची त्यांची क्षमता समोरच्याला आश्चर्यचकित करते. शिक्षणाची त्यांना आवड निर्माण झाल्याने पालकांच्या देखरेखी खालीच तेथे आता अक्षर ओळखची सुरूवात झाली. इंग्रजी व हिंदीवर त्यांची पकड असून भाषा कौशल्य विकसीत करण्याकडे त्यांचा कल आहे. संस्थेच्या या अथक प्रयत्नांना शिक्षण विभागाची जोड मिळाल्याने गणेशोत्सवानंतर आता या परिसरात वस्ती शाळा सुरू होत आहे. मिडटाऊन विद्यापीठाचे मार्क टेलर संशोधनासाठी नाशिक येथे आले असता एक दिवस ते या वस्तीत थांबले. त्यांनी येथील बालकांना टॅब दिले. कोणतेही शिक्षण नसतांना या बालकांनी टेलर यांच्या सूचनांनी अवघ्या काही मिनिटात टॅब हाताळला. अक्षर ओळखीचा प्रत्यय दिला. हा अनुभव अविस्मरणीय ठरला. पुढील काळात येथील बालविवाहाविषयी प्रबोधन करण्यावर भर राहणार असल्याचे चाकं शिक्षणाची संस्थेचे सचिन जोशी यांनी सांगितले.

मुलांसाठी वस्तीत शाळा

शहराच्या एकंदरीत परिस्थितीचा विचार केला तर वज्रेश्वरी परिसरात शाळाबाह्य़ मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही समजुतींमुळे तेथील लोक मुलांना शाळेत पाठवायला तयार नव्हते. मात्र त्यांचे समुपदेशन केल्यावर ते तयार झाले. मात्र शाळेत पाठवणार नाही ही त्यांची अट कायम असल्याने आम्ही त्या मुलांसाठी प्रायोगिक तत्वावर वस्तीतच शाळा सुरू करत आहोत. त्या ठिकाणी पहिली-दुसरी, तिसरी व चौथी असे एकत्रित वर्ग भरविण्यात येतील. त्यासाठी दोन स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून गणेशोत्सवानंतर हे वर्ग सुरू होतील.

– नितीन उपासनी (शिक्षणाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 5:17 am

Web Title: 309 children deprived from education in syed dwell
Next Stories
1 मालेगावमध्ये महिलेवर अत्याचार
2 मालती भोयेचे यशाच्या दिशेने ‘उडान’
3 गणेशोत्सवासाठी वाहतुकीवर विविध र्निबध
Just Now!
X