नववर्षांच्या स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिकांची जय्यत तयारी

सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी सारेच उत्सुक असताना तापमानाने त्यात नीचांकी पातळी गाठल्याने वातावरणात वेगळाच उत्साह संचारला आहे. गारठून टाकणाऱ्या थंडीत नववर्ष स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिकांनी खास डान्स फ्लोअरची रचना, संगीत मैफल, संगीताच्या तालावर बेधुंद होत ‘वाइन संगे रात्र रंगे’ अशा नानाविध उपक्रमांची आखणी सुरू केली आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विविध खाद्य पदार्थाची रेलचेलही सोबत असणार असून एकूणच नव्या वर्षांच्या स्वागताची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.

पाऊसमान चांगले राहिल्याने यंदाचा ‘थर्टी फस्र्ट’ दणक्यात साजरा होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी शहर परिसरातील विविध संस्था, हॉटेल, रिसॉर्ट, वाइनरीज् आणि गार्डन रेस्टॉरंन्ट सज्ज झाली आहेत. युवा वर्गात नव वर्ष साजरा करण्याची अधिक ओढ असते. हे लक्षात घेऊन त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळणार आहे. काही हॉटेलमध्ये तरुणाईला थिरकवणारी खास संगीत व्यवस्था केली जाईल. कुटुंबालाही या माहोलमध्ये सहभागी होता यावे, यासाठी काही ठिकाणी जोडप्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

या निमित्ताने संगीताच्या तालावर फटाक्यांची आकर्षक आतशबाजी करण्याचे नियोजन आहे. ग्राहकांसाठी काही व्यावसायिकांनी सोडत पद्धतीने भ्रमंती पॅकेज जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांत मद्य प्राशनाला महत्त्व आल्याने शासनाने मद्य विक्री दुकानांना वेळ वाढवून दिली. हॉटेल पहाटे पाचपर्यंत सुरू राहत असल्याने मद्यप्रेमींची चंगळ होते. खवय्यांसाठी पाश्चात्त्य संस्कृतीतील चविष्ट पदार्थासह अस्सल मराठमोळ्या चुलीवर स्वयंपाकापर्यंत असे बेत हॉटेल व्यावसायिक सादर करीत आहे. नाताळाची सुटी पाहता काहींनी सहकुटुंब जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वरसह भंडारदरा, गंगापूर व वैतरणा आदी ठिकाणी भ्रमंती करण्याची तयारी केली आहे. नववर्षांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिना अखेरीस खिशावर पडणारा भार आणि थंडीची वाढलेली तीव्रता पाहून काही मंडळी हा दिवस घरीच साजरा करतील. काही सोसायटी अन् वसाहतीत एकत्रितपणे ठरावीक वर्गणी काढून नववर्षांचे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.

सध्या महाविद्यालयात डेज्चा माहोल असल्याने तरुणाई मात्र यातून काहीसी अलिप्त राहत सायंकाळी पांडवलेणी, सोमेश्वर यासह काही ठिकाणी मित्रमंडळी सोबत फेरफटका मारण्याच्या तयारीत आहे. काही दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहत घरातच हा दिवस साजरा करणार आहे. थर्टी फर्स्टचे औचित्य साधून व्यसनांविरोधात जनजागृतीसाठी काही संस्था पुढे सरसावल्या आहेत.

‘थर्डीफस्र्ट’चा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा विश्वास ग्रूपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून गंगापूर रस्त्यावरील विश्वास लॉन्स येथे जपली जाणार आहे.

नववर्षांच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी सायंकाळी सहा वाजता संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या गीतांवर आधारित ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. निवेदन लेखक अंबरीश मिश्र करणार असून रागिणी कामतीकर, मिलिंद धटिंगण, विवेक केळकर या गायकांचा सहभाग असणार आहे.

बंदी आहे. गणेशोत्सवात पोलिसांनी या संदर्भात जनजागृती केली होती. डीजे वाजविणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचा ताजा इतिहास आहे. नववर्षांचे स्वागत करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी कोणी डीजेचा वापर केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

थंडीची लाट

पाच ते सहा दिवसांपासून नाशिकमध्ये आलेली थंडीची लाट नववर्षांच्या स्वागतापर्यंत कायम राहावी, अशी अपेक्षा नववर्षांच्या स्वागताची तयारी करणाऱ्या मंडळींची आहे. शुक्रवारी नाशिकच्या तापमानाने ७.६ अंश या हंगामातील नीचांकी पातळीची नोंद केली. वातावरणात कमालीचा गारवा जाणवत असल्याने घराबाहेर पडणाऱ्या बहुतेकांना उबदार कपडय़ांचा आधार घेणे भाग पडले. दिवसभर यापेक्षा वेगळी स्थिती नसते. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे वातावरणात उत्साह आहे. आठवडाभरापासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमध्ये थंडीची लाट आली असून बुधवारी ८.२ अंशावर असणारे तापमान दुसऱ्या दिवशी आणखी खाली आले. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर पडतो. सध्या उत्तर भारतात बर्फवृष्टी, थंडीची लाट आली आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडला. वातावरण जणू गोठवून टाकले आहे. नववर्षांच्या स्वागता वेळी थंडीची लाट आल्याने वातावरणात वेगळाच उत्साह संचारला आहे.