नाशिक : सलग चार ते पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर उघडीप घेतली. मागील २४ तासांत जिल्ह्य़ात ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागांत रिमझिम सरी बसरल्या. जिल्ह्य़ातील धरणसाठा ६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

काही अपवाद वगळता सुमारे दोन महिने दडी मारणाऱ्या पावसाचे ऑगस्टच्या मध्यावर आगमन झाले. मागील काही दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. पावसाअभावी पाणीटंचाईचे दाटलेले ढग यानिमित्ताने दूर झाले आहेत. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ग्रामीण भागात वेगळी स्थिती नव्हती. काही भागांत रिमझिम स्वरूपात त्याने हजेरी लावली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत इगतपुरीत ७८, नाशिक १८, दिंडोरी नऊ, पेठ ७१, त्र्यंबकेश्वर २८, मालेगाव १४, नांदगाव आणि चांदवड प्रत्येकी पाच, कळवण ३०, सुरगाणा ३१, देवळा १८, निफाड चार, सिन्नर दोन, येवला सहा मिलिमीटर पाऊस झाला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण अद्यापही बरेच कमी आहे. गेल्या वर्षी १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत १८ हजार १६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा याच काळात १० हजार ९७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन्ही वर्षांच्या पावसात सात हजार मिलिमीटरची तफावत आहे.

जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमीच

चार-पाच दिवस झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी उंचावण्यास हातभार लागला आहे. जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये सध्या ४२ हजार १८७ दशलक्ष घनफूट अर्थात ६२ टक्के जलसाठा आहे. पाणी पातळी उंचावल्याने नाशिक शहरासह अनेक भागांतील टंचाईचा प्रश्न संपुष्टात आला आहे. नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूरमध्ये ८३ टक्के, तर मुकणे धरणात ६३ टक्के जलसाठा झाला आहे. काश्यपीमध्ये ४४, गौतमी गोदावरीत ५३, आळंदी २४, पालखेड ७०, करंजवण ३७, वाघाड ४०, ओझरखेड ४४, पुणेगाव २७, तिसगाव ११, दारणा ८९, भावली १००, वालदेवी ९७, कडवा ९६, नांदुरमध्यमेश्वर ५४, भोजापूर १००, चणकापूर ६८, हरणबारी १००, केळझर ८१, नागासाक्या ८६, गिरणा ५५, पुनद ८७, माणिकपुंजमध्ये १०० टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या काळात जिल्ह्य़ातील धरणांमध्ये ८८ टक्के जलसाठा होता. यंदा हे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी आहे.