पुढील अडीच महिने कपातीविना पाणीपुरवठा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या १९०२ दशलक्ष घनफूट अर्थात ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. पावसाचे आगमन लांबल्यास अधिकचे काही दिवस पाणी देण्याची तयारी पाटबंधारे विभागाने दाखविली आहे. यामुळे या वर्षी कपातीला तोंड न देता आणखी अडीच महिने विनासायास पाणी मिळणार आहे. मात्र दुसरीकडे गळती आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पाणी बचतीचा नागरिकांसह खुद्द महापालिकेलाही विसर पडल्याचे चित्र आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्य:स्थितीत ३४ टक्के जलसाठा आहे. गंगापूर धरण समूहाचा विचार केल्यास एकूण ३८८२ अर्थात ३८ टक्के जलसाठा आहे. पुरेसा साठा असल्याने पाणीपुरवठय़ात कोणतीही अडचण येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

सर्वसाधारपणे पाण्याचे नियोजन करताना १५ जुलैपर्यंत पाणी आरक्षित केले जाते. पाऊस लांबल्यास हा कालावधी आणखी काही दिवसांनी वाढविण्याचा विचार पाटबंधारे विभागाने केला आहे. यामुळे कपात न करता जुलैअखेर किंवा त्यापुढील काही दिवसांपर्यंत नाशिककरांची तहान भागू शकते, असा अंदाज आहे.

पाण्याची कमतरता नसल्याने शहरातील दैनंदिन पाण्याचा वापर अधिक आहे. नाशिककरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होताना दिसत नाही. पाण्याचा सर्रासपणे अपव्यय होत आहे. पिण्याचे पाणी बगीचा, वाहने धुण्यासाठी वापरले जाते. अनेक इमारतींच्या टाक्या ओसंडून वाहताना दिसतात. तोटय़ा नसल्यामुळे नळांमधून पाणी वाया जाते. जलवाहिन्यांमधून मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. ही गळती रोखल्यास पाण्याची बचत करता येईल. परंतु नागरिकांसह महापालिकेचीही त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता झाली आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

मनमाड, येवलासारख्या शहरात १६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. या पाश्र्वभूमीवर दररोज नळाद्वारे मुबलक पाणी मिळणाऱ्या नाशिकमध्ये पाणीबचत ही संज्ञा लुप्त झाल्याचे चित्र आहे.

या वर्षी शहरात पाणीकपातीची वेळ येणार नाही. महापाालिकेचे पाण्याचे आरक्षण ३१ जुलैपर्यंत आहे. पाण्याचा अपव्यय, नासाडी करणाऱ्यांविरोधात विभागनिहाय कारवाई केली जात आहे. त्याचे प्रमाण मात्र कमी आहे. पाणी बचतीसाठी महापालिका वारंवार आवाहन करीत आहे.

– एस. एम. चव्हाण के, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

गंगापूर धरणात १९०२ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. समाधानकारक जलसाठा असल्याने पाणीकपात लागू करावी, अशी सूचना महापालिकेला केलेली नाही. मान्सून लांबल्यास आरक्षित पाण्याच्या कालावधी वगळता अधिकचे काही दिवस पाटबंधारे विभाग पाण्याची उपलब्धता करणार आहे.

– राजेंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नाशिक