प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील टाळेबंदीत हळूहळू शिथिलता आणण्याचे धोरण प्रशासनातर्फे अवलंबण्यात आले असतांनाच २४ तासात नाशिक जिल्ह्यात नव्याने ३९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

करोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर, २४ मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी प्रतिबंधित क्षेत्रांचा अपवाद वगळता शासनाने आता शिथिल केल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, त्याचवेळी बाधित रुग्णांची होणारी वाढ सर्वाची काळजी वाढविणारी ठरली आहे. २४ तासांत जिल्ह्य़ात प्राप्त झालेल्या १४० चाचणी अहवालांपैकी ३९ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यात नाशिकमधील १६, मनमाडमधील ११, मालेगाव १०, चांदवड एक आणि निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

नाशिकच्या खोडेनगर भागात सहा रुग्ण आढळून आले आहेत. कॅनॉल रोड भागात दोन तसेच राहुलवाडी, दिंडोरी रोड, भारदवाडी, जुने नाशिक, अशोका मार्ग, हिरावाडी, विजयनगर, सिडको आणि नाईकवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. मालेगावातील द्याने भागात सहा, सोयगाव आणि दातार नगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

शहराच्या मध्यवस्ती भागात अन्य दोन रुग्ण आढळून आले आहेत. मनमाड शहरात आठ आणि नांदगाव तालुक्यातील वडाळी येथील तीन जणांचे मनमाड रुग्णालयात तपासणीसाठी दिलेले नमुन्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. मनमाडच्या नवीन आठ जणांमध्ये निमोण चौफुलीतील आधीच्या रूग्णाच्या कुटुंबातील नवे  सात, तसेच आययुडीपी, गवळी मंगल कार्यालयामागील आधीच्या रूग्णाच्या कुटुंबातील एक जण पुन्हा सकारात्मक आढळून आला. शनिवारी मिळालेले सात अहवाल नकारात्मक आले. मनमाडमध्ये एकूण आठ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. मनमाडचा आठवडे बाजार रविवारी सलग १२ व्या आठवडय़ात बंद राहणार आहे.

नवीन ३९ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १४७४ वर जाऊन पोहचली आहे. त्यात मालेगाव शहर आणि तालुक्यातील ८५४ तर नाशिक शहरातील ३३९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ९७३ जण करोनामुक्त झाले असून चारशेच्या आसपास रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. करोनामुळे आतापर्यंत ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात मालेगाव शहरातील तब्बल ६३ जणांचा समावेश आहे.