जिल्ह्य़ात सात नवीन रूग्ण, ८२७ संशयितांचे अहवाल प्रलंबित

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पाच जिल्ह्यातील ४०७ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. विभागातून १० हजार १७० करोना संशयितांच्या स्त्रावांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एकूण आठ हजार १९४ संशयितांचे अहवाल नकारात्मक आले असून ८२७ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाली आहे. नाशिक जिल्ह्य़ात गुरूवारी सायंकाळी सात नवे करोनाग्रस्त रुग्ण आढळले.

विभागात सर्वाधिक २९१ करोनामुक्त रूग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात घेण्यात आलेल्या तीन हजार ८२८ नमुन्यांपैकी तीन हजार नऊ तपासणी अहवाल नकारात्मक आले असून  ७६ अहवाल प्रलंबित आहेत. जळगाव जिल्ह्य़ात तपासणी करण्यात आलेल्या दोन हजार ३५२ नमुन्यांपैकी एक हजार ६८३ अहवाल नकारात्मक आले असून ४३९ अहवाल प्रलंबित आहेत. २९ रूग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यत एक हजार ७८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ६८० नकारात्मक असून करोनामुक्त ४० रूग्णांना घरी सोडण्यात आले. २१ अहवाल प्रलंबित आहेत. धुळे जिल्ह्यतील एक हजार २८५ करोना संशयितांच्या नमुन्यांपैकी एक हजार ३३ संशयिताचें अहवाल नकारात्मक आले. करोनामुक्त झालेल्या ३७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. १८० अहवाल प्रलंबित आहेत.

मालेगाव आयुक्तांचे गृह विलगीकरण

बुधवारी मालेगाव महापालिका आयुक्त करोना बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर आयुक्त स्वतच गृह विलगीकरणात गेले आहेत. त्यांना कुठलाही त्रास नाही तसेच कोणतीही लक्षणे त्यांच्यात दिसून येत नाही. श्वसनाचा त्रास होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सकाळी ५० सूर्यनमस्कार घातले. अन्य व्यायाम आणि प्राणायाम देखील केला. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सहकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहत करोना संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनावर ते लक्ष ठेवून होते. शहराला लवकरच करोना मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केला.