नाशिक : जिल्ह्यात दैनंदिन करोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा ५४ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून यातील ४१ हजार ६३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १०६४ जणांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत जवळपास ११ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहराबरोबर ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे.

जिल्ह्यातील करोनास्थितीची माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ५३ हजार ५१६ इतका आहे.

यातील ७७.८० टक्के रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ६८.६१ टक्के, नाशिक शहरात ८१.२८, मालेगावमध्ये ७५.८१  टक्के तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये ३१८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५९४, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १२६ आणि जिल्ह्य़ाबाहेरील २६ अशा एकूण १०६४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तीन हजार ८८१ रुग्ण आहेत. यात नाशिक तालुक्यात ५५५, चांदवड १७०, सिन्नर ५६२, दिंडोरी ९९, निफाड ८६८, देवळा ८२,  नांदगाव ४५१, येवला ११४, त्र्यंबकेश्वर ५०, सुरगाणा दोन, पेठ नऊ, कळवण ७०, बागलाण २९९, इगतपुरी १५७, मालेगाव ग्रामीण ३३८ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सहा हजार २८१ रुग्ण उपचार घेत आहेत. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ६३८  तर जिल्ह्याबाहेरील १८ असे एकूण १० हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आकडेवारी लक्षात घेतल्यास शहराप्रमाणे ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. निफाड, सिन्नर, नांदगाव, नाशिक, मालेगाव या तालुक्यांत रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते.