नाशिक शहरातील उत्तमनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने २५-३० जणांना चावा घेत जखमी केले आहे. जखमींमध्ये लहान मुले व प्रौढ नागरिकाचा समावेश आहे. या हल्ल्यात ६ जण गंभीर गंभीर जखमी झाले असून यामध्ये चेतना पाटील (वय दीड वर्षे), साई पाटील (वय ३), साहिल वाघ (वय ४), प्राजक्ता  काबदे (वय ५) रोहित पाटील (वय ७) या पाच लहान मुलांचा समावेश आहे. तर किशोर मोरे (वय ३९) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध प्रभागात मोकाट कुत्र्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी ऑफिस सुटल्यावर घरी येणाऱ्या  व पहाटेच्या दरम्यान नोकरीनिमित्त ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना मोकाट वावरणाऱ्या कुत्र्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो. दुचाकी चालवत असताना रस्त्यात आडवे येणाऱ्या कुत्र्यांमुळे शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे  मोकाट कुत्र्यांचा महापालिकेकडून त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे.