२४ तासात पाच जण बाधित

मालेगाव : मालेगावात ‘करोना कहर’ सुरूच असून २४ तासात पाच रुग्णांच्या करोना तपासणीचे सकारात्मक अहवाल आढळून आल्यामुळे बाधित रुग्णाची संख्या आता ४१ वर पोहोचली आहे. पाचही करोनाबाधित रुग्ण हे आधी आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले.

आधीच्या करोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक आणि संपर्कात आल्याने अलगीकरण केलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी पाठवलेल्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी बुधवारी दिवसभरात ३२ अहवाल प्राप्त झाले होते. त्यात चार जणांचे अहवाल सकारात्मक आले होते. गुरुवारी पुन्हा २६ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व नकारात्मक आहेत. मात्र हृदयरोगाच्या शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथील एका रुग्णालयात दाखल असलेल्या येथील एका वृद्धाचा गुरुवारी प्राप्त झालेला अहवाल सकारात्मक असल्याचे आढळून आले.

संचारबंदीच्या स्थितीत लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट होणार नसेल तर संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होणे अवघड असल्याचे  प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे करोना रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित भागात दूध,भाजीपाला, इंधन, किराणा माल आदी आवश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून  प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.