दूषित पाण्यामुळे मातोरी गावात शेकडो ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असतांना रविवारी रात्री सिडको परिसरात कुल्फी खाल्ल्यामुळे ५० जणांना विषबाधा झाली. या घटनेतील अत्यवस्थ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रतिबंधक विभागाने कुल्फीचे नमुने ताब्यात घेतले असून संशयितांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
सध्या उकाडय़ामुळे थंडगार पदार्थाकडे सर्वसामान्यांचा ओढा आहे. त्यामुळे आईसक्रीम, सरबत व उसाचा रस तसेच कुल्फी यांची विक्री जोमात सुरू आहे.
रविवारी रात्री सिडकोतील लेखानगर येथे साईनाथ बेस्ट मावा कुल्फी पार्लर या हातगाडय़ावरील कुल्फी ग्राहकांसाठी विषबाधेचे कारण ठरली. सायंकाळपासून ज्या ज्या ग्राहकांनी ही कुल्फी घेतली, त्यातील काहींना उलटी, मळमळ, जुलाब यासह अन्य त्रास सुरू झाला. अचानक हा त्रास का होत आहे याची कारणमींमासा केली असता संबंधितांनी कुल्फी खाल्ल्याचे निदर्शनास आले. विषबाधा झालेल्या काही नागरिकांना जवळच्या खासगी रुग्णालयात तसेच उर्वरित लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर निद्रिस्त असलेल्या अन्न व औषध प्रशासनाला जाग आली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात या पद्धतीने थंडावा देणाऱ्या पदार्थाची विक्री होत असते. परंतु आजवर त्यांची तपासणी या विभागाने केली नव्हती. परंतु ही घटना घडल्यानंतर त्याची दखल या विभागाला घेणे भाग पडले. अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांकडील कुल्फीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रकरणी अद्याप अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही.