News Flash

‘स्मार्ट कार्ड’पासून ५० हजार विद्यार्थी वंचित

महामंडळाच्या नाशिक विभागाने पासधारक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन दीड लाख पासची मागणी नोंदविली.

महामंडळाने साधारणत: दोन वर्षांपूर्वी पासधारक प्रवाशांना कागदी पास देण्याऐवजी काही वर्षे चांगले टिकू शकतील,

दोन वर्षांनंतर एसटीच्या अत्याधुनिक पास योजनेचे वास्तव
पासधारक विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या वेळेची बचत करण्यासोबत वाहकांचे काम सुलभ करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ या अत्याधुनिक स्वरूपात पास देण्याच्या योजनेपासून आजही जिल्ह्य़ातील हजारो विद्यार्थी वंचित असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्य़ातील पासधारक विद्यार्थ्यांची एकूण संख्या दीड लाख असून त्यातील एक लाख जणांना आतापर्यंत ‘स्मार्ट कार्ड’ देणे शक्य झाले. उर्वरित ५० हजार जणांना त्याची प्रतीक्षा आहे. नांदगाव आगार वगळता जिल्ह्य़ातील सर्व आगारांत या योजनेची अंमलबजावणी होत आहे. तथापि, पुरेशा स्मार्ट कार्डअभावी नेहमीचे कागदी पास देत वेळ निभावून नेली जात आहे.
महामंडळाने साधारणत: दोन वर्षांपूर्वी पासधारक प्रवाशांना कागदी पास देण्याऐवजी काही वर्षे चांगले टिकू शकतील, या स्वरूपाचे प्लास्टिक स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेंतर्गत देण्यात येणारे चार व सात दिवसांचे पास तसेच मासिक, त्रमासिक आणि विद्यार्थी पास यासाठी आधुनिक स्वरूपाचे हे स्मार्ट कार्ड वापरले जात आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय पातळीवर स्मार्ट कार्डचा वापर सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत नाशिक-१ आगारात ही यंत्रणा कार्यान्वित झाली होती. त्यानंतर पुढील काळात सर्व आगारांमध्ये रडतखडत टप्प्याटप्प्याने ही योजना कशीबशी लागू झाली. नांदगाव आगारात आजही तिचे अस्तित्व नाही. प्रारंभीच्या काळात स्मार्ट कार्डसाठी लागणारी यंत्रणाच उपलब्ध झाली नव्हती. जिल्ह्य़ातील १२ आगारांसाठी एकूण १०९ यंत्रणा मागविण्यात आल्या. त्या विलंबाने उपलब्ध झाल्यानंतर तिच्यात त्या त्या आगाराशी संबंधित मार्ग समाविष्ट करताना कसरत झाली. या यंत्रणेमार्फत पास वितरणाच्या कामाचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागले. १२ आगारांमध्ये ही यंत्रणा वितरित केली गेली, पण स्मार्ट कार्डचा तुटवडा असल्याने उपरोक्त आगारांमध्ये १०० टक्के काम तिच्यामार्फत झालेले नाही.
नाशिक जिल्ह्य़ात पासधारकांची एकूण संख्या तब्बल दीड लाखाच्या घरात आहे. तुलनेत केवळ एक लाख स्मार्ट कार्ड उपलब्ध झाले. पासधारकांच्या तुलनेत कमी कार्ड उपलब्ध झाल्यामुळे या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.
महामंडळाच्या नाशिक विभागाने पासधारक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन दीड लाख पासची मागणी नोंदविली. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला, परंतु आजतागायत केवळ एक लाख स्मार्ट कार्ड उपलब्ध होऊ शकले. पुरेसे कार्ड नसल्याने उर्वरित ५० हजार विद्यार्थ्यांना कागदी पास घेणे भाग पडते. हे कार्ड लवकरच उपलब्ध करण्यासाठी महामंडळाचा पाठपुरावा सुरू आहे.
पासधारक विद्यार्थ्यांबरोबर मासिक, त्रमासिक, ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाते. अधिक लाभाच्या या योजनांसाठी स्मार्ट कार्डचा मात्र तुटवडा नाही. याकरिता आवश्यक तितके कार्ड आगारांकडे उपलब्ध असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

स्मार्ट कार्ड योजनेचे लाभ
* कागदी पास भिजून खराब होण्याचा धोका संपुष्टात
* हाताळण्यास सोपे
* स्मार्ट कार्डसाठी ३० रुपये शुल्क
* सलग दोन ते पाच वर्षे एकाच कार्डचा वापर शक्य
* कागदी पासप्रमाणे दर शैक्षणिक वर्षांत अर्ज भरण्याची गरज नाही
* ओळखपत्रासाठी अतिरिक्त पाच रुपये
* गुप्त सुरक्षा कळ असल्याने कार्डच्या गैरवापरास प्रतिबंध

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 2:09 am

Web Title: 50 thousand students deprived from smart card
Next Stories
1 स्वच्छतागृहासाठी ‘मार्शल’चा पालिकेसमोर ठिय्या
2 नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील मार्गदर्शकांपासून ‘मानधन’ दूरच
3 कंपनीची तिजोरी लुटणारे दोघे गजाआड
Just Now!
X