पिंपळनारे बाजारातील प्रकार; धनादेशावर दोन महिन्यानंतरची तारीख

नऊ नोव्हेंबर रोजी खुद्द पंतप्रधानांनी ५०० आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरविल्या. सरकारने जाहीर केलेली काही विशिष्ट ठिकाणे वगळता जुन्या नोटा व्यवहारात वापरणेही बंद झाले. यामुळे शहरी व ग्रामीण भागात बहुतांश व्यवहार थंडावलेले आहेत. बाजार समितीत ठप्प झालेले लिलाव धनादेशाच्या पर्यायाद्वारे पूर्ववत केले गेले. तथापि, नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील पिंपळनारे फाटय़ावरील बाजारात मात्र आजही व्यापारी जुन्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा देऊन कृषिमालाचे व्यवहार करत आहेत. धनादेशाने रक्कम हवी असल्यास दोन महिन्यानंतरची तारीख टाकली जाईल, असे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. मजुरांचे पैसे द्यावयाचे असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव जुने चलन स्वीकारावे लागते. त्यानंतर ही रक्कम रांगेत उभे राहून एकतर बँकेतून बदली करणे अथवा स्वत:च्या खात्यात जमा करावी लागते. या कसरती झाल्यावर मजुरांना मजुरी देताना सुटय़ा पैशांची अडचण भेडसावते ती वेगळीच. जुने चलन स्वीकारून शेतकऱ्यांना असा ‘द्राविडी प्राणायाम’ करावा लागत आहे. दुसरीकडे व्यापारी वर्गाकडून काळ्याचे पांढरे करण्यासाठी या तंत्राचा वापर केला गेल्याची साशंकता व्यक्त होत आहे.

[jwplayer CdTbNsE8]

कृषिमालाच्या विक्रीसाठी जिल्ह्यात १५ बाजार समित्या कार्यान्वित असून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने कृषिमाल नियमनमुक्त करत कुठेही माल विकण्याची मुभा दिली. हे व्यवहार रोखीने होतात. नोटा रद्दबातल केल्याचा मोठा फटका त्यांना बसला. रोकड नसल्याने सात ते आठ दिवस बाजार समितींचे कामकाज बंद राहिले. त्यात शेतकऱ्यांची कोंडी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने धनादेशाद्वारे कृषिमालाचे पैसे देण्याचा तोडगा काढून बाजार समितींचे कामकाज पूर्ववत केले. तसेच धनादेशाची रक्कम चोवीस तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, याकरिता नऊ बाजार समित्यांमध्ये बँकांच्या सहाय्याने सुविधा केंद्रही स्थापन करण्यात आले. यामुळे बहुतांश बाजार समितीत धनादेशाद्वारे आपल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत असले तरी गाव पातळीवर एकत्रितपणे असणाऱ्या घाऊक बाजारात मात्र वेगळे चित्र आहे. नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील पिंपळणारे फाटय़ाजवळील बाजार हा त्यापैकीच एक. याच स्वरूपाचे बाजार गिरणारे व अन्य ठिकाणी भरत असल्याचे शेतकरी सांगतात. ढकांबे, पिंपळनारे, मानोरी, तुंगलदरा, रासेगाव, बेहेरवाडी, उमराळे, मडकीजांब, इंदोरे, खतवड यासह आसपासच्या गावातील शेकडो शेतकरी िपपळनारे बाजारात कृषिमाल विक्री करतात. टोमॅटोचा मोठा बाजार म्हणून त्याची ओळख आहे. या बाजारात व्यापारी सर्रासपणे ५०० व एक हजाराच्या नोटा शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत.

कोणी धनादेशाची मागणी केल्यास चलन गोंधळाचे कारण देत व्यापारी दोन महिन्यांपुढील तारीख टाकून ते देण्याची तयारी दर्शवितात. शेतीची कामे व मजुरांची देणी यासाठी पैशांची तातडीने निकड असल्याने जुन्या नोटा स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसल्याची व्यथा अनेक शेतकऱ्यांनी मांडली. या व्यवहारांवर कोणाचे नियंत्रण नसल्याने व्यापारी बाजार समितीप्रमाणे माल विक्रीची पट्टीही देत नाहीत. यामुळे कृषिमाल विकून जुन्या नोटा प्राप्त झाल्याचा कोणताही पुरावा राहत नाही. व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या जुन्या नोटा इतरत्र स्वीकारल्या जात नाहीत. नोटा रद्दबातल झाल्यानंतर आधीच टोमॅटोसह इतर कृषिमालाचे भाव गडगडले. चलन गोंधळाआधी टोमॅटोच्या २० किलो जाळीचा भाव १३० ते १४० रुपये इतका होता. सध्या व्यापारी टोमॅटोच्या जाळीला केवळ ६० ते ८० रुपये भाव देतात. एका जाळीचा उत्पादन खर्च ३० ते ३५ रुपयांच्या घरात आहे. या स्थितीत नाशवंत माल खराब होऊ नये म्हणून तो मिळेल त्या भावात आणि जुन्या नोटा मिळाल्या तरी विकणे भाग पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जुन्या नोटांमुळे शेतकऱ्यांची कसरत

कृषिमाल विक्री करून जुन्या नोटा मिळाल्या तरी व्यवहारात त्या कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे बँकेत जाऊन त्या बदली करणे अथवा स्वत:च्या खात्यात भरण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागते. जुन्या नोटांच्या बदल्यात बँक नवीन दोन हजाराच्या नोटा देते. यामुळे अडचण कमी होण्याऐवजी आणखी वाढते. दोन हजाराची नोट मजुरांना कशी वाटप करायची, हा प्रश्न आहे. मजुरांना सुटय़ा पैशांच्या स्वरूपात त्यांची संपूर्ण मजुरी हवी असते. मजुरी न मिळाल्यास कामावर न येण्याची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाते. त्यामुळे तीन ते चार मजूर मिळून अनेकदा एकत्रित स्वरूपात दोन हजाराची नोट द्यावी लागत आहे. मजुरांना मजुरी देतानाही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

काळ्याचे पांढरे करण्याबाबत साशंकता?

रद्दबातल झालेल्या जुन्या नोटा शेतकऱ्यांच्या माथी मारून काळा पैसा व्यापाऱ्यामार्फत सहजपणे चलनात आणला जाऊ शकतो, असे अर्थ विषयातील जाणकारांचे मत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना सौदा पट्टी देत नाहीत. जुन्या एक हजार व पाचशेच्या नोटा देऊन ते काही ठिकाणी व्यवहार करत आहेत. या नोटा घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याने माल विक्री करून या जुन्या नोटा शेतकरी स्वत:च्या खात्यात टाकतात. या घडामोडीत व्यापारी वर्ग काळ्याचे पांढरे करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी हे व्यवहार होतात, तिथे कोणाचेही नियंत्रण नाही. यामुळे व्यापारी वर्गाचे फावणार असून शेतकरी वर्ग भरडला जात आहे.

[jwplayer y8Pn2zMM]