मालेगाव : शहरातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणे सुरूच असून रविवारी या रुग्ण संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला. नव्याने २८ रुग्ण आढळल्याने मालेगावातील एकूण बाधितांची संख्या आता ३२६ झाली आहे. तर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ५५ वर पोहचली आहे. संपूर्ण शहराला विळखा घालणाऱ्या करोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.

रविवारी एकूण १४६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात १०८ अहवाल नकारात्मक, तर ३८ अहवाल सकारात्मक आले. सकारात्मक अहवालांमध्ये १० अहवाल हे जुन्या रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे आहेत. त्यामुळे आता नव्याने आढळलेल्या बाधितांची संख्या २८ आहे. प्रारंभी शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागात करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. नंतर हळूहळू शहराच्या पश्चिम भागातही करोनाचा शिरकाव होत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत संपूर्ण शहरालाच करोनाचा विळखा पडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका डॉक्टरला करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. रविवारी आढळून आलेल्या २८ बाधित रुग्णांमध्ये या डॉक्टरचा  समावेश आहे. पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या निमित्ताने शहराची चांगली जाण असलेला हा डॉक्टर काही दिवस करोना प्रसाराची कारणे आणि नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याचा अभ्यास करीत होता. या निमित्ताने पाहणीसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात हा डॉक्टर फिरत होता. याशिवाय दाभाडी येथील एक खासगी डॉक्टरही बाधित असल्याचे आढळून आल्याने शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही करोनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केल्याचे उघड होत आहे. या डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

करोनाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनातर्फे घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत त्यामुळे दिवसागणिक वाढ होत आहे. महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी आणखी १३ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केली. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ५५ वर पोहचली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना अन्यत्र जाण्यास आणि या क्षेत्राबाहेरील लोकांना तेथे येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा संपूर्ण भाग बंदिस्त करण्यात आला असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त आहे. या भागातील रहिवाशांना आवश्यकतेनुसार प्रशासन आणि स्वयंसेवकांतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे.

‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम

करोना संकटामुळे उपचाराअभावी ‘नॉन कोविड’ रुग्णांची हेळसांड होत असल्याची ओरड काही दिवसांपासून सुरू आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला असून एप्रिल महिन्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत अडीच पटीने शहरातील मृतांची संख्या वाढल्याची आकडेवारी आहे. रुग्णांची ही हेळसांड थांबविण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे शहरात ११ फिरत्या व्हॅनद्वारे डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. आवश्यक असणारे डॉक्टर आणि अन्य सहाय्यकारी कर्मचारीवर्ग महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून विविध भागातील रुग्णांची जागेवर तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. या तपासणीत सारी, करोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करुन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. जैन संघटनेचा हा उपक्रम करोनामुक्त मालेगाव होण्यासाठी नक्कीच खारीचा वाटा उचलेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग आदी उपस्थित होते.