देवळाली छावणी मंडळाच्या निवडणुकीतील यंत्रे; न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे पोलीस बंदोबस्तही कायम

देवळाली छावणी मंडळाची निवडणूक होऊन तीन वर्षे लोटली. या निवडणुकीत मतदानासाठी नेहमीच्या मतपत्रिकांऐवजी मतदान यंत्राचा प्रथमच वापर झाला होता. त्यामागे पारदर्शक आणि जलदपणे मतदान, मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, अशी अपेक्षा होती. मतमोजणीनंतर सर्व जागांवरील निकाल जाहीर झाले. काही वॉर्डातील उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यामुळे त्या निवडणुकीत मतदानासाठी वापरलेली जवळपास ५५ मतदार यंत्रे आजही छावणी मंडळाच्या कार्यालयातील गोदामात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना अहोरात्र खडा पहारा द्यावा लागतो. पुढील निवडणुकीला केवळ दोन वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत ही स्थिती कायम राहणार की काय, अशी साशंकता स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.

देवळाली छावणी मंडळाच्या जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला होता. मतदान यंत्रांचा वापर करून झालेली छावणी मंडळाची ही पहिलीच निवडणूक. याआधी छावणी मंडळाच्या निवडणुकीत कागदी मतपत्रिकांचा वापर केला जात होता.

छावणी मंडळाच्या मतदानात प्रथमच ईव्हीएम यंत्राचा वापर होऊनही काही प्रभागांत निकालाविषयी आक्षेप कायम राहिले. दोन वॉर्डातील उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यात मयत उमेदवार, परदेशात वास्तव्यास असणाऱ्या उमेदवारांनी मतदान केल्याचा एका उमेदवाराचा आक्षेप आहे. अतिशय कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या घडामोडींमुळे निवडणूक शाखेने छावणी मंडळाच्या कार्यालयातील गोदामात मतदान प्रक्रियेत वापरलेली सर्वच्या सर्व मतदान यंत्रे ठेवली आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणात अंतिम निकाल येईपर्यंत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील माहिती काढून टाकता येत नाही. ती एका जागेवरून दुसरीकडे हलविता येत नाही. यामुळे छावणी मंडळाच्या गोदामात आजही निवडणुकीसाठी वापरलेली यंत्रे तशीच ठेवण्यात आल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही मतमोजणीनंतर तीन महिने सर्व यंत्रांतील मतदानासंबंधीची माहिती तीन महिने कायम ठेवली जाते. निवडणूक निकालानंतर काही उमेदवार न्यायालयात जाण्याची शक्यता असते. न्यायालयीन प्रक्रियेत मतदान यंत्रातील मतमोजणी, तत्सम माहिती लागू शकते. तीन महिन्यांत एखाद्या निवडणुकीसंबंधी न्यायालयीन प्रकरण न उद्भवल्यास यंत्रातील माहिती काढून टाकली जाते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणेला मतदान यंत्रांची सुरक्षा जपणे आवश्यक आहे. छावणी मंडळाच्या ज्या गोदामात ही मतदान यंत्रे ठेवलेली आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण दररोज चार कर्मचारी तैनात असतात.

तीन वर्षांपासून मतदार यंत्राच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था कार्यान्वित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. छावणी मंडळाची पुढील निवडणूक २०२० मध्ये होईल. तिला आता केवळ दीड ते दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्या निवडणुकीपर्यंत ही मतदान यंत्रे छावणी मंडळाच्या गोदामात राहतील, असा अंदाजही स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.