पावसाच्या आगमनाविषयी हवामान खात्याचे अंदाज बदलत असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांमधील एकूण जलसाठा अवघ्या सहा टक्क्यांवर आला आहे. एकूण २३ लहान-मोठय़ा धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ ३६६४ दशलक्ष घनफूट जलसाठा असून पावसाचे आगमन लांबल्यास टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या ग्रामीण भागास गंभीर संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आठ धरणे आधीच कोरडीठाक झाली असून नऊ धरणांमध्ये जेमतेम पाणी असल्याने ती देखील कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. या स्थितीत गंगापूर धरणात पुढील दोन महिन्यांची तहान भागविता येईल इतका जलसाठा असल्याने शहरवासीयांना नव्याने झळ बसणार नाही. मात्र, ग्रामीण भागात त्या विपरित स्थिती असल्याने शेतकरी, सर्वसामान्यांसह प्रशासकीय यंत्रणाही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

तीन ते चार महिन्यांपासून टळटळीत उन्हाचे चटके सहन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यास आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. गतवर्षी पावसाअभावी धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा न झाल्यामुळे पाणी टंचाईच्या संकटाला शहरी व ग्रामीण भागास तोंड द्यावे लागले. दिवसागणिक ही स्थिती चिंताजनक होत आहे. खरेतर नाशिक हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची तहान या भागातील धरणांमार्फत शमविली जाते. असे असताना हा परिसर यंदाच्या हंगामात टंचाईच्या संकटात सापडला आहे. शेकडो गाव व पाडय़ांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस झाल्याशिवाय या संकटावर तोडगा निघणार नाही. हवामान विभागाने प्रथम पावसाचे लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज दिल्यामुळे सर्वाना हायसे वाटले. परंतु, तो अंदाज नंतर मान्सून काहिसा विलंबाने येणार असल्याचे बदलल्यावर पाणी टंचाईचे संकट कोणते स्वरुप धारण करणार, याची धास्ती व्यक्त होत आहे.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

नाशिक जिल्ह्यात मध्यम व मोठे असे एकूण २३ प्रकल्प असून त्यातील आठ प्रकल्प आधीच कोरडेठाक पडले आहेत. नऊ धरणांमध्ये २ ते ८ टक्के जलसाठा असल्याने पाऊस लांबल्यास त्यांचा समावेश कधीही रिक्त धरणांच्या यादीत होईल. म्हणजे उर्वरित सात धरणांमध्ये तुलनेत बरी स्थिती असल्याचे दिसून येते. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १३३८ दशलक्ष घनफूट, पालखेड ४६, करंजवण २७७, वाघाड १५६, ओझरखेड २४२, पुणेगाव ७२, तिसगाव ४४, दारणा २३२, भावली ७२, वालदेवी २३, कडवा ४३, आळंदी ६२, चणकापूर ६२६, हरणबारी ३४१, केळझर धरणात ८६ दशलक्ष घनफूट जलसाठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे गिरणा धरण कोरडे झाले आहे. या व्यतिरिक्त नागासाक्या, काश्यपी, गौतमी-गोदावरी, मुकणे, आळंदी, पुनद, भोजापूर यांचीही तीच स्थिती आहे. बहुतांश धरणातील जलसाठा वेगाने कमी होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वाना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.