तीन वर्षांत गुन्ह्य़ांचा आलेख उंचावला; २०१७ मध्ये २४० प्रकार

नाशिक : शहरात फसवणुकीचे दोन प्रकार घडले आहेत. यामध्ये सुमारे ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षांत फसवणुकीच्या गुन्ह्य़ांचा आलेख उंचावत असल्याचे दिसत आहे. २०१५ मध्ये वर्षभरात फसवणुकीचे एकूण १६२ गुन्हे दाखल झाले होते. २०१७ मध्ये या गुन्ह्य़ांची संख्या २४० वर पोहोचली आहे.

पहिल्या घटनेत वाहनांची खरेदी न करता बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अशोक डेर्ले यांनी तक्रार दिली आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी १० संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे नाशिक रोड-देवळाली व्यापारी बँकेच्या पाथर्डी शाखेतून कर्ज मंजूर करून घेतले. वाहन खरेदी न करता संशयितांपैकी एकाने स्वत: संचालक असल्याचे दर्शवत त्याच्या नावावर कांचन मोटर्स अ‍ॅक्सीस बँक, अंबड शाखा आणि फ्युचर कार आयसीआयसीआयच्या शरणपूर रोड शाखेतून ३५ लाख ११ हजार रुपये काढून वाहन खरेदी न करता बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पाथर्डी फाटा येथील विवेक उगले, कुऱ्हेगाव येथील जयराम गव्हाणे, जेल रोड येथील दिनकर जाधव, आहुर्ली येथील ज्ञानेश्वर बांबळे, कुऱ्हेगाव येथील सुनील धोंगडे, विष्णू कोंबडे, सुरेश कोंबडे, म्हाडा कॉलनीतील गिरीश पगार आणि पाथर्डी गावातील नागुजी भुसारे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार सतीश शुक्ल (गोरेराम लेन, यशवंत महाराज पटांगण) यांनी दिली. या प्रकरणी काशिनाथ जाधव आणि महेंद्र जाधव (राजवाडा, आडगाव) या बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ल यांनी जाधव यांच्या मालकीच्या शेतजमिनीचा व्यवहार केला होता. २०१२ मध्ये जाधव यांनी शुक्ल यांच्याशी संपर्क साधत आडगाव शिवारातील एक हेक्टर तीन आर १०३ गुंठे वडिलोपार्जित शेतजमीन विक्रीचा प्रस्ताव मांडला होता. ठरल्याप्रमाणे इसार पावती लिहून देत काही दिवसांत खरेदी करण्याचे ठरल्याने शुक्ल यांनी त्यांना वेळोवेळी तब्बल २७ लाख ५० हजारांची रोकड दिली. ही रक्कम धनादेश आणि रोख स्वरूपात दिली गेली. व्यवहारात निश्चित झालेली पूर्ण रक्कम देऊनही जाधव यांनी जमीन देण्यात टाळाटाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

मागील तीन वर्षांत फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१५ मध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे एकूण १६२ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील १२१ गुन्ह्य़ांचा तपास करण्यात आला. पुढील वर्षांत म्हणजे २०१६ मध्ये या गुन्ह्य़ांचे प्रमाण १८२ वर पोहोचले. त्यातील १३५ गुन्ह्य़ांची उकल करण्यात यंत्रणेला यश मिळाले. २०१७ मध्ये फसवणुकीचे २४० गुन्हे दाखल झाले. त्यातील १७२ म्हणजे ७२ टक्के गुन्ह्य़ांची उकल करण्यात आली. फसवणुकीच्या घटनांचा आलेख उंचावत असून नागरिकांसह संस्थांनी हे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.