News Flash

स्वस्त सहलींना भुलून ६४ ज्येष्ठांची फसवणूक

इंटरनेटवर आकर्षक पॅकेजेस दाखवून पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याच्या जाहिराती झळकत असतात.

प्रकरणातील संशयित फरार; पोलिसांचे विशेष पथक कोलकात्याला रवाना
देशांतर्गत सहलीचे आमिष दाखवून कोलकातास्थित पर्यटन कंपनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गोविंदनगर भागात राहणाऱ्या ६४ ज्येष्ठ नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित फरार असून त्याच्या शोधासह सखोल चौकशीसाठी एक पथक कोलकत्ताला रवाना झाले आहे.
इंटरनेटवर आकर्षक पॅकेजेस दाखवून पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याच्या जाहिराती झळकत असतात. कोलकाताच्या दि गोल्डन ट्रिप्स कंपनीने दिलेल्या अशाच काही पॅकेजेसची शहरातील ज्येष्ठ नागरिकांना भुरळ पडली. गोविंद नगर परिसरात राहणारे सुमतीलाल बुरड यांना संबंधित कंपनीकडून ऑगस्ट २०१५ मध्ये देशांतर्गत सहलीसाठी आग्रह धरला जात होता.
यासाठी कंपनीतील संशयित मनीष शर्मा व चिराग शर्मा यांनी संगनमत करून ऑगस्ट २०१५ ते ११ जानेवारी २०१६ पर्यंत बुरड यांना ई मेलद्वारे व दुरध्वनीवरून विविध योजनांची माहिती दिली. त्यात आसाम, सिक्कीम व मेघालय येथे सहलीला जाण्यासाठी प्रत्येकी ११ हजार ६०० रुपये खर्च ठरवण्यात आला. यासाठी संशयितांनी सांगितल्या प्रमाणे बुरड यांनी बँकेत ८० हजार रुपये भरले. मात्र ट्रॅव्हल कंपनी व्यवस्थापनाने याबाबतची कोणतीही माहिती न देता बुरड यांच्याकडे पुन्हा पुन्हा उर्वरीत रक्कमेची धनादेशाद्वारे मागणी केली. वेळोवेळी इ मेल किंवा दुरध्वनीच्या माध्यमातून त्यांना पैसे भरण्यास सांगण्यात आले. गोविंदनगर येथील नाशिक र्मचट सहकारी बँकेच्या खात्यातून संशयितांनी आरटीजीएस प्रणालीचा वापर करून आपल्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात एक लाखाहून अधिक रक्कम जमा केली.
दुसरीकडे परिसरातील ६४ ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हाच प्रकार घडला. संशयितांकडून केवळ पैसे भरा असेच सातत्याने त्यांना सांगण्यात आले. या माध्यमातून ज्येष्ठांना आतापर्यंत ५ लाख ९० हजार रुपयांचा आर्थिक भरुदड सोसावा लागला. पैसे घेऊनही सहलीचे काही निश्चित होत नसल्याने वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली.

प्रत्येकी साडेसहा लाखांची फसवणूक
या प्रकारात संशयितांनी साडे सहा लाखाहून अधिक रकमेला फसविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल छाननी करण्यासाठी पोलिसांचे पथक कोलकाताला पाठविले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयास्पद कारभार असलेल्या सहल कंपन्यांच्या जाहिरातींना न भुलता मान्यताप्राप्त सहल आयोजकांकडे आपल्या नावाची नोंद करण्याचे आवाहनही पोलिसांनी या वेळी नागरिकांना केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 12:05 am

Web Title: 64 senior cheated in the name of country trip
टॅग : Cheating
Next Stories
1 संदर्भ सेवा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रस्त
2 उन्नत महाराष्ट्र अभियानातून ग्रामीण विकास
3 रविवारी पल्स पोलिओ लस मोहीम
Just Now!
X