28 February 2021

News Flash

जिल्ह्य़ातील धरणांमध्ये ६६ टक्के जलसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी पाणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी पाणी

नाशिक : जिल्ह्यातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये सध्या ४३ हजार ७० दशलक्ष घनफूट अर्थात ६६ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के जलसाठा कमी असला तरी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नसल्याचे चित्र आहे. नियोजनानुसार पिण्यासह शेतीला पाणी उपलब्ध होईल. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६० टक्के जलसाठा आहे.

थंडी निरोप घेत असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे सोमवारी ढगाळ वातावरण होते. दोन वर्षांपूर्वी पावसाळा बराच लांबला होता. त्यामुळे पाण्याची आवर्तने उशिरा सोडली गेली. परंतु गेल्या वर्षी तशी स्थिती नव्हती. त्यामुळे सध्या धरणातील जलसाठय़ात ही तफावत दिसण्यामागे आवर्तन सोडण्याच्या वेळापत्रकातील बदल हे कारण ठरले. उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्याची चाहूल फेब्रुवारीत जाणवू लागते. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शासन, प्रशासन पातळीवरून टँकरमुक्त गावांची कितीही घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात उन्हाळ्यात विरोधाभासी चित्र दिसते असा आजवरचा अनुभव आहे. त्यात या उन्हाळ्यात फारसा फरक पडणार नाही.

जिल्ह्यात सात मोठे तर १७ मध्यम प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. १५ फेब्रुवारी २०२० रोजी या धरणांमध्ये ५१ हजार ७३ अर्थात ७८ टक्के जलसाठा होता. पाऊस लांबल्याने आवर्तने विलंबाने सोडली गेली. यंदा मात्र नियोजित वेळापत्रकानुसार धरणातून आवर्तन दिले जात आहे.

नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ३३८१ दशलक्ष घनफूट (६० टक्के) जलसाठा आहे. या धरण समूहातील काश्यपीमध्ये १३३९ (७३), गौतमी गोदावरी ८०७ (४३) आणि आळंदी धरणात ५४६ (६७) जलसाठा आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत महापालिकेच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत शहरास टंचाईला तोंड द्यावे लागणार नसल्याचे दिसून येते.

पालखेड धरण समूहात ४३०० दशलक्ष घनफूट म्हणजे ५२ टक्के जलसाठा आहे. यामध्ये पालखेड धरणात २४९ (३८), करंजवण ३३१२ (६२), वाघाड ७३९ (३२) असा जलसाठा आहे. ओझरखेड धरणात १४०७ (६६), पुणेगाव ३७७ (६१), तिसगाव २७७ (६१), दारणा ६२१६ (८७), भावली १३३८ (९३), मुकणे ५०२८ (६९), वालदेवी १०४८ (९२), कडवा ८८३ (५२), नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात २५७ (१००), भोजापूर २५२ (७०), चणकापूर १८२४ (७५), हरणबारी ८९० (७६), केळझर ४०२ (७०), नागासाक्या ३२० (८१), गिरणा १०७८१ (५८), पुनद ११७५ (९०) आणि माणिकपुंज धरणात २१२ (६३) टक्के इतका जलसाठा आहे.

दोन धरणांतून आवर्तन

जिल्ह्यातील चणकापूर धरणातून ५७५ क्युसेस तर गिरणा धरणातून १४०० क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला आहे. सर्व धरणातील पाण्याचे पिण्यासह सिंचन, औद्योगिक आदी प्रयोजनार्थ नियोजन आधीच झालेले आहे. त्यानुसार धरणातून आवर्तने सोडली जातात. गेल्या वर्षी आवर्तने उशिराने सोडावी लागली होती. यंदा मात्र तशी स्थिती नाही. निश्चित झालेल्या वेळापत्रकानुसार धरणांतून आवर्तने सोडली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 12:03 am

Web Title: 66 percent water storage in dams of the nashik district zws 70
Next Stories
1 रस्त्यांच्या कामावरून पालिकेतील सत्ताधारी भाजपचा मुखभंग
2 लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
3 वादविवाद, रखडपट्टी आणि दुप्पट भुर्दंड.. 
Just Now!
X