जिल्ह्य़ात दोन लाख जणांची नोंदणी बाकी

जिल्ह्य़ातील डिसेंबर २०१५ मधील अंदाजित ६४ लाख ६० हजार ४८८ लोकसंख्येच्या तुलनेत सध्या ६२ लाख २५ लाख ८५१ अर्थात ९६.३७ टक्के आधार नोंदणी पूर्णत्वास गेली असून आता केवळ दोन लाख ३४ हजार ६३७ जणांची नोंदणी बाकी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बँक खाते, शासकीय योजना आणि तत्सम बाबींसाठी आधारची सक्ती केली जात आहे. त्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याचे जाहीर झाल्यामुळे जे वंचित राहिले, त्यांची आधार नोंदणीसाठी लगबग सुरू आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये सुमारे ८०० आधार कार्डाच्या अद्ययावतीकरणासाठी केंद्र कार्यान्वित होत आहेत. या केंद्रात आधार कार्ड संलग्न करणे वा दुरुस्तीसारखी कामे होऊ शकतील. नवीन आधार कार्डसाठी नागरिकांना शासनाच्या केंद्रात जावे लागणार आहे.

आधार कार्डसाठी संकलित केल्या गेलेल्या माहितीच्या सुरक्षेवरून देशात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी शहर आणि जिल्ह्य़ात विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीसाठी पालकांना भटकंती करावी लागत होती. अनेक केंद्रांवर महिना ते दोन महिन्याची आगाऊ नोंदणी झाली होती. याच काळात केंद्र चालकांनी कामाचे पैसे मिळत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाने जिल्ह्य़ातील आधार कार्डच्या नोंदणीची आकडेवारी उघड केली आहे. २०११ मध्ये जिल्ह्य़ातील लोकसंख्या ६१ लाख ०७ हजार १८७ इतकी होती. तिचा विचार करता आठ जानेवारी २०१८ पर्यंत जिल्ह्य़ात त्याहून अधिक म्हणजे १०१.९४ टक्के नोंदणी झालेली आहे. २०१५ मधील अंदाजित लोकसंख्या ६४ लाख ६० हजार ४८८ आहे. त्या लोकसंख्येचा विचार करता एकूण ६२ लाख २५ हजार ८५१ इतकी नोंदणी झाली आहे. या बाबतची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली. याच लोकसंख्येचा विचार करता सध्या दोन लाख ३४ हजार ६३७ जणांची आधार नोंदणी बाकी आहे.

जिल्ह्य़ात सध्या एकूण १५० आधार नोंदणी केंद्र कार्यरत असून त्यापैकी ४१ शहरात आहेत. या केंद्रांवर नवीन आधार कार्ड नोंदणीऐवजी कार्डमधील चुकांची दुरुस्ती, आधार कार्ड बँक खाते, भ्रमणध्वनीला संलग्न करणे आदी कामे अधिक्याने केली जातात. डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्य़ात आधारशी संबंधित एक लाख १५ हजार कामे करण्यात आली. त्यातील नवीन कार्ड नोंदणीधारकांची संख्या केवळ पाच हजार इतकी होती. उर्वरित कामे ही आधार कार्ड संलग्न करणे वा दुरुस्तीची असल्याचे मंगरुळे यांनी नमूद केले. प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमांद्वारे शालेय विद्यार्थ्यांची बहुतांश नोंदणी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. बँक खाते आधार कार्डला जोडणे, भ्रमणध्वनी क्रमांकासाठी आधार कार्डशी निगडीत कामे, आधार कार्ड नोंदणीत झालेल्या चुकांची दुरुस्ती वा तत्सम कामे लवकरच राष्ट्रीयकृत बँकांमधील अद्ययावतीकरण केंद्रात होऊ शकतील. रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांना आपल्या शाखांमध्ये ही केंद्र सुरू करण्याचे सूचित केले आहे. मध्यंतरी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधीची बैठक झाली. शहर आणि ग्रामीण भागात सुमारे ८०० केंद्र पुढील काही दिवसात कार्यरत होत असल्याने नागरिकांची धावपळ काहीअंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

सुरगाणा आघाडीवर, नांदगाव पिछाडीवर

आधार नोंदणीत जिल्ह्य़ात सुरगाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात १०७ टक्के अर्थात एकूण एक लाख ९९ हजार ८ जणांची आधार नोंदणी झाली आहे. आधार नोंदणीत नांदगाव तालुका पिछाडीवर पडला आहे. या तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत सध्या दोन लाख २७ हजार ७५२ (७४.५४ टक्के) नोंदणी झाली आहे. तालुकानिहाय विचार करता नाशिकमध्ये १०६.४१ टक्के, मालेगाव तालुक्यात ९४.१२, निफाड ९०.१२ , बागलाण ९८.०६, दिंडोरी ८७.४५, सिन्नर ९३.८१, येवला ९१.४६, इगतपुरी ९३.७६, चांदवड ९३.२४, नांदगाव ७४.७३, कळवण ९३.७३, सुरगाणा १०७.०१, त्र्यंबकेश्वर ९६.३१, देवळा ९७.६६, पेठ ८२.९७ अशी आधार नोंदणीची टक्केवारी आहे.