21 September 2020

News Flash

गोदावरी नदी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध सहा महिन्यांत ८६ गुन्हे

२०१६ ते आतापर्यंत तीन हजार ८५६ गुन्हे दाखल करून ८२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक : गोदावरी प्रदूषण केल्याच्या कारणावरून सहा महिन्यांत ८८ गुन्हय़ांची नोंद करण्यात आली आहे. २०१६ ते आतापर्यंत तीन हजार ८५६ गुन्हे दाखल करून ८२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या बैठकीत कारवाईची माहिती समोर आली. उपायुक्त रघुनाथ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पोलीस यंत्रणेने केलेल्या कारवाईची माहिती दिली. या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दुष्यंत उइके, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित आदी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. या संदर्भात सिंहस्थ कुंभमेळ्याआधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर काम करत आहे. या कामाचे अवलोकन करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत नाशिकरोड येथील पिण्याच्या पाण्याचा साठा दूषित असून तो प्रदूषणविरहित करण्याचे सूचित करण्यात आले. वालदेवी नदीत प्रदूषणावर जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी मिळून केलेल्या उपाययोजना, कार्यवाही केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी) तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असल्याचे मनपाचे कार्यकारी अभियंता वंजारी यांनी सांगितले. पिंपळगाव खांब आणि तपोवनच्या खालच्या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पिंपळगाव खांब येथील जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संपादित करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले.संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ऑनलाइन बैठकीत सादर करण्यात आला.

दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांना नोटीस

औद्योगिक वसाहतीतील काही कारखाने दूषित पाणी नदीपात्रात सोडतात. यावर आजवर पर्यावरणप्रेमींनी अनेकदा आक्षेप नोंदविला आहे. ही बाब आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केली. काही कारखाने दूषित पाणी पात्रात सोडत असल्याने नदी प्रदूषणात भर पडत आहे. अशा उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बैठकीत सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:27 am

Web Title: 86 case registered against godavari river pollution in six months zws 70
Next Stories
1 जिल्ह्य़ात ‘१०८ क्रमांक’ रुग्णवाहिकाची जलद सेवा
2 जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या २२ हजारांकडे
3 शहरात प्रतिबंधित क्षेत्रांत ८१३ इमारती
Just Now!
X