नाशिक : मालेगावमधील ८७ पोलिसांनी करोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा मानस व्यक्त केला आहे.

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सर्वसामान्य नागरिकांसह कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मालेगावमध्ये हा आकडा ठळकपणे नजरेत येत असतांना पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

मागील आठवडय़ात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत करोनामुक्त झालेल्या पोलीस योद्धय़ांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रविवारीही मालेगावमधील करोनाग्रस्त पोलिसांपैकी ८७  मुक्त झाले.

यामध्ये नाशिक ग्रामीणचे ४१ पोलीस, जालना राज्य राखीव दलाचे ३३, औरंगाबाद राज्य राखीव दलाचे सहा, अमरावती राज्य राखीवचे चार, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचा एक तसेच जळगाव पोलीस दलातील दोन अशा ८७ पोलिसांनी करोनावर मात केली. दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह या मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत. अत्यंत संवेदनशील असलेल्या शहरात बंदोबस्ताचे नियोजन आणि अमलबजावणीसाठी काम सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. करोनावर मात करत रुग्णालयातून बाहेर परतणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उर्वरीत रुग्णही करोनामुक्त होतील, असा विश्वास पोलिसांमध्ये आहे.