९० टक्के रस्त्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाच्या अनुदानातून आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नातून जुन्याच रिंगरोडच्या दुरूस्तीसाठी ५०० कोटी रुपये खर्च करूनही कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करून शहरातील ९० टक्के रस्त्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याबद्दल माजी महापौर दशरथ पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुंभमेळ्यात केलेल्या सर्व रस्त्यांची आयुक्तांनी पाहणी करून त्रयस्थ प्रयोगशाळेकडून कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी उत्तम दर्जाचे साहित्य न वापरल्याने मूळ पायापासून ते शेवटच्या थरापर्यंत रस्ते तुटण्यास व खराब होण्यास वरच्या थरापासून सुरूवात झाली असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे राज्य शासन व मनपाचे आर्थिक नुकसान होणार आहे. रस्त्यांच्या या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास व रस्त्यांचे लेखा परीक्षण विभागाकडून ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत रस्ते न टिकल्यास तसेच डागडुगीकरिता मनपाचा खर्च अर्थात जनतेच्या करातील रक्कम खर्च झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी करारनामा केलेल्या दिवसापासून प्रशासनात काम करणाऱ्या सर्वच विभागांना स्वीकारावी लागेल. त्यात आयुक्तांचीही तितकीच जबाबदारी असेल, हेही निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे. शहरातील खराब होत चाललेले रस्ते पुन्हा एकदा ठरलेल्या प्राकलनाप्रमाणेच करून घ्यावेत, म्हणजे सरकारचे व नाशिककरांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. ज्यांनी या कामात निष्काळजीपणा किंवा कामाचा दर्जा व संपूर्ण साहित्याचा वापर करण्यात दुर्लक्ष केले, त्यांचीही चौकशी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी नाशिककरांना न्याय न मिळाल्यास राज्य सरकारला साकडे घालून महापालिकेची खरी परिस्थिती मांडून महापालिका बरखास्ती व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कामांच्या संदर्भात प्रशासनास कार्यवाही करण्यास विलंब झालेला आहे. तसेच डोळेझाक आणि दुर्लक्षही केल्याचे निदर्शनास येत आहे. या वर्षांत कमी पाऊस झाल्याने संपूर्ण रस्त्याच्या कामांची परीक्षा अपूर्णच आहे. अल्पशा पावसानेही या रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडले. सलग काही दिवस पाऊस सुरू राहिला असता तर रस्त्यांची पार वाट लागली असती. रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी त्वरीत पावले उचलण्याची गरज आहे. २००३ च्या कुंभमेळ्यात आपल्या महापौरपदाच्या कारकीर्दीत करण्यात आलेल्या रिंगरोडची बांधणी टिकाऊ झाल्याची आठवणही पाटील यांनी करून दिली आहे.