जिल्हा करोनाग्रस्तांच्या संख्येच्या बाबतीत हजारच्या दिशेने वाटचाल करीत असून शनिवारी दुपापर्यंत संख्या ९०४ पर्यंत गेली आहे. ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव झाला असला तरी देवळा आणि त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, इगतपुरी हे आदिवासी तालुके अद्याप करोनामुक्त आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने आरोग्य विभागासह पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. जिल्ह्यात २४ तासात १३ नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी रात्री उशीराने संजीव नगर येथील मयत व्यक्तीच्या संपर्कातील दोन जण बाधित असल्याचा अहवाल आला. त्यांच्या संपर्कातील ५३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ११ जणांचे अहवाल सकारात्मक आले.

त्यातील एक महिला लेखानगर, एक पंचवटीतील आहे. शनिवारी सकाळी महापालिका हद्दीत कॉलेजरोड येथील निर्माण व्हिला, सिडको येथील राणाप्रताप चौक परिसरात दोन करोनाग्रस्त आढळल्याने महापालिका हद्दीत ही संख्या ६९ पर्यंत गेली आहे. कॉलेज रोड येथील ५१ वर्षांंचे पोलीस अधिकारी मालेगाव येथे कार्यरत होते. मालेगावहून परतल्यावर ते भुजबळ नॉलेज सिटी येथे विलगीकरण कक्षात उपचार घेत होते.

शनिवारी त्यांचा अहवाल सकारात्मक आला. राणाप्रताप चौक येथील ३४ वर्षांच्या युवकाने मुंबईचा प्रवास केला होता. त्याला सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने खासगी डॉक्टरांकडे त्याने उपचार घेतले.

शनिवारी त्याचा अहवाल सकारात्मक आला. ते राहत असलेला परिसर तातडीने प्रतिबंधित करण्यात आला. नाशिक महापालिका परिसरात प्रतिबंधित क्षेत्र १९ वर पोहचले आहेत.

ग्रामीण भागात नाशिक ग्रामीण नऊ, चांदवड पाच, सिन्नर नऊ, दिंडोरी नऊ, निफाड १६, नांदगाव १०, येवला ३३, कळवण एक, सटाणा दोन, मालेगाव ग्रामीण १७ याप्रमाणे रूग्णसंख्या आहे. मालेगाव महापालिका हद्दीत एक रुग्ण आढळला. तसेच जिल्ह्याबाहेरील ३९ रुग्ण नाशिकमध्ये उपचार घेत आहेत.