News Flash

स्वागत समिती सदस्यत्वासाठी किमान पाच हजार रुपये शुल्क

मार्गदर्शक समितीत लोकप्रतिनिधी तर सल्लागार समितीत प्रशासकीय अधिकारी

मार्गदर्शक समितीत लोकप्रतिनिधी तर सल्लागार समितीत प्रशासकीय अधिकारी

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीत सदस्य होण्यासाठी किमान पाच हजार रुपये शुल्क इच्छुकांना द्यावे लागणार आहे. या समितीत जिल्ह्यातील २९ साहित्यिक संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यतील साहित्यिकांना मात्र समितीचे विनाशुल्क मानद सदस्यत्व दिले जाईल. मार्गदर्शक समितीत महापौर, सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तर सल्लागार समितीत विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, मुक्त विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

कॉलेज रस्त्यावरील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली आहे. संमेलनाच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर तयारीने वेग पकडला आहे. संमेलनात राज्यासह देश विदेशातून साहित्यिक, मराठीवर प्रेम करणारी मंडळी येणार असल्याने त्यांच्या सरबराईत कुठेही कमतरता राहू नये, हा लोकहितवादी मंडळाचा प्रयत्न आहे. संमेलनाच्या तयारीसाठी एकूण ३९ समित्या गठीत केल्या जाणार आहेत. त्यातील स्वागत, सल्लागार, मार्गदर्शक समित्यांची स्थापना झाली असून त्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तर उपाध्यक्षपदी कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आणि गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले, कार्यवाहपदी जयप्रकाश जातेगांवकर जबाबदारी सांभाळतील. संमेलनासाठी स्थापन होणाऱ्या विविध ३९ समित्यांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संमेलनानिमित्त स्थापन होणाऱ्या समित्यांमध्ये नागरिकांना समाविष्ट केले जाणार आहे. कोणत्या समितीत काम करायला आवडेल ते सांगितल्यास त्यानुसार त्यांना त्या त्या समितीत समाविष्ट केले जाईल. नागरिकांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन टकले यांनी केले.

स्वागत समितीत सदस्य होण्यासाठी देणगी वजा शुल्क द्यावे लागणार आहे. किमान पाच हजार आणि त्यापेक्षा अधिक रक्कम देणाऱ्यांना स्वागत समितीत स्थान मिळेल. शहर, जिल्ह्यातील २९ संस्थांचा या समितीत सहभाग आहे. ही समिती सर्वासाठी खुली असून शुल्क भरून कोणालाही त्यात सहभागी होता येईल. जिल्ह्यातील साहित्यिकांना या समितीत मानद सदस्यत्व दिले जाणार असून त्यांना कोणतेही शुल्क लागणार नसल्याचे टकले यांनी नमूद केले.

लोकप्रतिनिधी मार्गदर्शक समितीत

मार्गदर्शक समितीत महापौर, सर्व खासदार-आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांना स्थान देण्यात आले आहे. सल्लागार समितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:19 am

Web Title: 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan zws 70
Next Stories
1 नाशिकचे साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल
2 नाशिक-बेळगाव विमानंसेवेला सुरुवात
3 वरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू
Just Now!
X