अनिकेत साठे

*  जिल्ह्य़ातील सव्वादोन लाखांची आधार जोडणी बाकी

*  अंतिम मुदतीस सात दिवस राहिल्याने कामगार, कर्मचारी अस्वस्थ

भविष्यनिर्वाह निधी खात्याशी आधार संलग्न करण्याची मुदत संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्य़ात अद्याप तब्बल सव्वा दोन लाख जणांची जोडणी होणे बाकी असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांसह विनाअनुदानित शाळा-महाविद्यालये, खासगी संस्थांच्या कर्मचारी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. तर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने आधारबाबत दिलेल्या निकालाने दिलासा मिळेल की नाही, याबद्दलही संभ्रम आहे.

केंद्र सरकारने भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित प्रक्रिया २०१२ पासून ऑनलाइन करण्यास सुरुवात केली. त्या दृष्टिकोनातून खातेधारकांना आधार संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले. जिल्ह्य़ात कारखाने, विनाअनुदानित शाळा-महाविद्यालये, लघुउद्योग, सहकारी साखर कारखाने, सूत गिरणी आदींमधील पाच लाखहून अधिक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे खातेधारक आहेत. त्यांची आधार संलग्नता  मुदत २ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे.

ऑनलाइन माहिती समाविष्ट करताना झालेल्या चुकांमुळे घोळ झाल्याची तक्रार कामगार संघटना करीत आहे. जिल्ह्य़ातील एकूण खातेधारकांपैकी केवळ ५२ टक्के आधार जोडणी झाली आहे. उर्वरित ४८ टक्के खातेधारकांची जोडणी झाली नसल्याचे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 चुकांना संबंधित आस्थापना जबाबदार

आधार संलग्न करण्याची जबाबदारी त्या त्या आस्थापनांवर होती. झालेल्या चुकांना त्या आस्थापनाच जबाबदार आहेत. आधार जोडणीसाठी कार्यालयाने कारखान्यांसह विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयात चर्चासत्र घेऊन मार्गदर्शन केले होते. प्रत्येक वेळी आस्थापनांना कामातील प्रगती संथ असल्याची जाणीव करून देण्यात आली. जिल्ह्य़ात ४८ टक्के अर्थात सुमारे दोन लाख २१ हजार जणांची खाती आधारशी जोडली गेलेली नाहीत.

– ललित लहामगे, लेखाधिकारी, भविष्यनिर्वाह निधी कार्यालय

भरमसाट चुकांमुळे मनस्ताप

कामगारांची माहिती  संगणकीय प्रणालीत समाविष्ट करताना प्रचंड चुका झाल्या.  एकटय़ा बॉश कारखान्यात ५०० ते ६०० कामगारांचे आधार संलग्न झालेले नाहीत. कोणाचे नाव अर्धवट,  कोणाची केवळ आद्याक्षरे, जन्मतारीख तसेच नोकरीला लागण्याच्या तारखेत बदल असे घोळ आहेत. या चुकांची कामगारांना झळ बसणार आहे.  निधी कार्यालयाने जबाबदारी स्वीकारून तोडगा काढावा.

– प्रवीण पाटील, अध्यक्ष, बॉश कामगार संघटना

न्यायालय निकालानंतर काय?

‘आधार’च्या वैधतेवर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. हा निर्णय पीएफ खात्यासाठी लागू होईल का, याबद्दल संभ्रम आहे. भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने उपरोक्त निकालानंतर मुख्यालयाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचे सांगितले. ऑनलाईन प्रक्रियेत खातेधारकाची ओळख पटविण्यासाठी आधार संलग्नता गरजेची असते. या व्यवस्थेतून खातेधारकांना ऑनलाईन व्यवहार करता येतील. पीएफ खातेधारकांना या संलग्नतेचा लाभ होणार असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

त्रुटी अशा दूर करता येतील

चुका झाल्या, त्यांना त्या दुरुस्त करता येतात. जन्म तारीख चुकीची नोंद झाली असेल तर शाळेचा दाखला जोडून अर्ज करावा. नोकरीला लागण्याच्या तारखेत बदल असल्यास संबंधित व्यक्ती जिथे काम करत असेल, त्यांचे पत्र घेऊन अर्ज सादर करू शकतो, असे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने म्हटले आहे. आधार कार्डवर ज्या नोंदी आहेत, त्या जुळल्याशिवाय पीएफ खाते संलग्न होत नाही. आधार कार्डमध्ये नावाची आद्याक्षरे किंवा अन्य काही चुका असतील तर खातेधारकांना मात्र त्या आधारच्या सेवेतून दुरुस्त करून घ्याव्या लागणार आहेत.