26 March 2019

News Flash

‘तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहा’

‘आम्ही नाशिककर’चे आवाहन

आयुक्त तुकाराम मुंढे

‘आम्ही नाशिककर’चे आवाहन

महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्यासाठी काही कठोर, परंतु धाडसी आणि उपयुक्त निर्णय घेतले. मात्र, नेहमीप्रमाणे शहराच्या विकासाच्या नावाखाली काही स्वार्थी संधिसाधू मंडळी मुंढे यांच्या मार्गात अडथळे निर्माण करू पाहत आहेत. या परिस्थितीत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक संस्था, संघटना आदींनी मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन ‘आम्ही नाशिककर’ या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंढे यांना आपला पाठिंबा असल्याचे जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी निर्णय घेतल्यावर त्यांच्याविरोधात वातावरण तयार केले जात आहे.  महापालिकेत संपाची भूमिका, स्थायी समितीत असहकार्य या घडामोडी सुरू झाल्या आहेत. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने आयुक्त थेट सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक सादर करणार आहेत. नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. स्मार्ट नाशिकसाठी शिस्त हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.  नाशिक शहराला स्मार्ट बनविणे एकटय़ा व्यक्तीचे काम नाही. यामुळे शहरातील प्रत्येक क्षेत्रातील संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक आदींनी त्यांना साथ देण्याची गरज आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन छाजेड यांच्यासह रमेश बागुले, जयराम सैदाणे, उत्तम बडदे आदींनी केले आहे.

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सत्ताधारी भाजप-आयुक्त यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. कोणतेही नवीन काम हाती घेताना निकड, तांत्रिक बाबी आणि निधीची उपलब्धता या निकषांवर त्याचे मूल्यमापन होणार असल्याचे पालिका आयुक्तांनी जाहीर केले आहे. मध्यंतरी स्थायी समितीत अंदाजपत्रक सादर करण्याचे आयुक्तांनी जाहीर केल्यावर भाजपने त्यास आक्षेप नोंदविला होता. स्थायी सभापती, आणि सदस्य नसताना अंदाजपत्रक कसे सादर होईल, असा प्रश्न उपस्थित केला. स्थायी अस्तित्वात नसल्याने नियमावलीचा आधार घेऊन आयुक्त आता सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक सादर करणार आहे. या घडामोडींमुळे भाजपचे पदाधिकारी धास्तावले आहेत. सर्वसाधारण सभेच्या आधी स्थायी समिती गठित करून अंदाजपत्रक त्याच ठिकाणी सादर व्हावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. मालमत्ता करवाढ करताना सभागृहात घेतलेला निर्णय भाजपने जनतेचा रोष पाहून काही अंशी मागे घेतला. अनेक वर्षांत वाढ झाली नसल्याने करवाढ करावी, असा प्रशासनाचा आग्रह आहे. नियमानुसार काम करण्याचा आयुक्तांचा आग्रह आहे. सत्ताधाऱ्यांचा त्यास कसा प्रतिसाद मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.

कामांत अडथळा आणण्याचा प्रयत्न

कोणताही प्रकल्प राबविताना शहराच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मुंढे हे प्रशासकीय, आर्थिक शिस्त लावत आहे. महापालिका रुग्णालयांची स्थिती पाहून त्यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिकेचे पावित्र्य, जबाबदारी आणि कर्तव्याशी कटिबद्धता राखत मुंढे यांनी आपला मार्ग आखला आहे. परंतु, काही मंडळी त्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करीत असल्याचा आरोप आम्ही नाशिककर संस्थेने केला.

First Published on March 10, 2018 2:14 am

Web Title: aamhi nashikkar organization comment on ias officer tukaram mundhe