सुमारे ३०० उद्योग-व्यवसाय सुरू होणार, १४० अर्जावर निर्णय बाकी

नाशिक : करोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी लागू असल्याने सर्व उद्योग व्यवसायांवर निर्बंध आले असताना यातून जीवनावश्यक बाबी, औषधांशी संबंधित उद्योगांना वगळण्यात आले आहे. औषध निर्मिती, जीवनावश्यक वस्तू, माहिती तंत्रज्ञान, बांधणी, अत्यावश्यक सेवा आणि पुरवठा विषयक सेवा देणाऱ्या २९६ उद्योगांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. तर ९२ उद्योगांना परवानगी नाकारली गेली आहे. १४० अर्जावर अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

टाळेबंदीमुळे जीवनावश्यक वगळता सर्व आस्थापना, कारखाने, उद्योग, व्यवसाय बंद करण्याचे आदेश आधीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. सरकारने जीवनावश्यक बाबींशी निगडित अर्थात अन्न प्रक्रिया, कृषी, औषधी, माहिती तंत्रज्ञान अशा काही मोजक्याच क्षेत्रातील उद्योगांना अटी-शर्तीवर सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक उद्योग सुरू ठेवण्यास अडचणी उद्भवतात. त्याचे निराकरण करण्यासह परवानगी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर सोपविली गेली आहे.

उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे जिल्ह्य़ाचे आर्थिक चक्र थंडावले आहे. अनेक उद्योगांनी मऔविम कार्यालयाकडे सुरू करण्यास परवानगी मागितली होती. सद्य:स्थितीत जे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी आहे, त्यांना ते सुरू करण्यास साहाय्य केले जात आहे. त्यांच्या अडचणींचे निराकरण केले जात आहे.

आतापर्यंत २९६ उद्योगांना अटींवर आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले. तर ९२ उद्योगांना परवानगी नाकारण्यात आली. साधारणत: १४० अर्जावर कार्यवाही सुरू आहे. परवानगी दिलेल्या उद्योगात महिंद्राचा समावेश आहे. परंतु, त्यांना ही परवानगी नियमित वाहन निर्मितीसाठी नव्हे, तर व्हेंटिलेटर संशोधनासाठी देण्यात आलेली आहे. जीवनावश्यकच्या यादीत नसणाऱ्या काही उद्योगांनी परवानगीसाठी अर्ज केले होते. पण ते नाकारण्यात आले.

जिल्ह्य़ात पॅकेजिंग क्षेत्रातील सुमारे पाच हजार लहान-मोठे उद्योग आहेत. पण, औषधी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित पॅकेजिंग उद्योगांना ते सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

कमीतकमी मनुष्यबळात काम, सामाजिक अंतराचे पालन आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधितांवर टाकण्यात आली आहे.

सध्या कार्यान्वित असणारे उद्योग

*  औषधी ४७

*  जीवनावश्यक वस्तू ८५

*  माहिती तंत्रज्ञान १४

*  इतर (पॅकेजिंग, अत्यावश्यक सेवा, पुरवठा) १५५