‘एचपीटी’तील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
पहिल्या पर्वणीत पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्ताविषयी माध्यमांमधून टिकेची झोड उठली असली तरी ज्या भाविकांनी त्या दिवशी स्नानाचा योग साधला, त्यातील बहुतांश म्हणजे जवळपास ८७ टक्के जणांनी पोलिसांचे सहकार्य मिळाल्याचे मत नोंदवित सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. महत्वाची बाब म्हणजे, सिंहस्थात नवमाध्यमे व भ्रमणध्वनी ‘अ‍ॅप’चा बराच बोलबाला झाला. तथापि, प्रत्यक्षात बहुतेकांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा वापर करण्याची गरजही अनेकांना वाटली नाही.
येथील हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पर्वणीत केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष आहेत. या दिवशी बरीच पायपीट करावी लागली..खासगी वाहन चालकांनी लूट केली..गोदावरीची स्वच्छता चांगली होती..पोलिसांच्या अतिउत्साहामुळे स्नानाचा मनासारखा आनंद घेता आला नाही, असा सूर भाविकांमधून उमटत आहे. पहिल्या पर्वणीतील एकंदर नियोजनावरून गहजब उडाल्यानंतर प्रशासनाने पुढील पर्वणीत काही फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लोखंडी जाळ्यांनी शहरवासीयांना स्थानबध्द करण्यात आल्यापासून ते बंदोबस्तावरील पोलिसांच्या एकंदर कार्यशैलीविषयी माध्यमांमधून अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. तथापि, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाने पोलिसांना काहीसा दिलासा मिळेल. पोलिसांचे वर्तन व सहकार्य भाविकांच्या पसंतीला उतरल्याचे या सव्‍‌र्हेक्षणातून स्पष्ट होत आहे. या सव्‍‌र्हेक्षणाचे निष्कर्ष प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, रमेश शेजवळ आणि कौमुदी परांजपे यांनी जाहीर केले. स्नानासाठी भाविकांना बरीच पायपीट करावी लागल्याचे म्हटले जात असले तरी वाहतूक व्यवस्थेविषयी भाविकांची नाराजी अधिक प्रमाणात दिसून आली नाही. ३५ टक्के भाविकांनी वाहतूक व्यवस्था अतिउत्तम तर २३ टक्के भाविकांनी उत्तम व्यवस्थेचा दाखला दिला. वाहतूक व्यवस्था साधारण असल्याचे मत २६ टक्के तर अतिवाईट होती असे १२ टक्के भाविकांनी नोंदविले. पाच टक्के भाविकांनी मतप्रदर्शन करण्यास नकार दिला.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीत येण्याचा जवळपास सर्व भाविकांचा उद्देश साध्य झाला. म्हणजे, सर्वच भाविकांनी गोदावरीत स्नान केल्याचे आढळून आले. जल प्रदुषणाच्या मुद्यावर कोणी तक्रार केली नाही. उलट ८० टक्के भाविकांनी गोदावरी शुध्द व स्वच्छ होती, असे प्रमाणपत्र दिले. २० टक्के भाविकांनी नकारात्मक मत नोंदविले. पर्वणीत जिवनावश्यक वस्तुंच्या किंमतींमध्ये वाढ झाली नसल्याचे ५१ टक्के भाविकांनी नमूद केले. प्रशासनाने या काळात स्वयंसेवकांची मोठी फौज उभी केली. पण, त्यांची आणि स्वयंसेवी संस्थांची मदत झाली नसल्याचे मत ३४ टक्के भाविकांनी नोंदविले.म्हणजे ६६ टक्के भाविकांना त्यांची मदत झाल्याचे लक्षात येते. स्थानिक नागरिकांचे देशभरातून आलेल्या भाविकांना सहकार्य लाभल्याचे मत ७१ टक्के भाविकांनी नोंदविले. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच्या व्यवस्थेवर निम्मे समाधानी होते, असे सव्‍‌र्हेक्षण सांगते. एकूण ३०० भाविकांचे मत या सव्‍‌र्हेक्षणासाठी घेण्यात आले.