नागरिकत्व दुरुस्ती आणि संशोधन कायदा, स्वाक्षरी अभियानावरून आरोप-प्रत्यारोप

नाशिक : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ अभाविपच्यावतीने  शहरातील के.टी.एच.एम. आणि भोसला महाविद्यालयात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानास छात्रभारतीने विरोध केला. यावरून केटीएचएम महाविद्यालयात अभाविप आणि छात्रभारतीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. समर्थक आणि विरोधकांमुळे  महाविद्यालयात काही काळ तणाव राहिला. महाविद्यालयाने तटस्थ भूमिका घेत असे काही आवारात करू नये, असे दरडावल्यानंतर संभाव्य बिकट परिस्थिती टळली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात काही संघटनांनी स्वाक्षरी मोहीम राबविली आहे. त्यास हिंदुत्ववादी संघटना देखील विविध पातळीवर प्रत्युत्तर देत आहेत. अभाविपने या कायद्याच्या समर्थनार्थ भोसला, केटीएचएम महाविद्यालयात सकाळपासून स्वाक्षरी अभियान राबविले. या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी अभाविपने विद्यार्थ्यांना माहिती देऊन सीएए आणि एनआरसी समर्थनार्थ स्वाक्षरी घेतली.  हा कायदा भारतातील कुठल्याही अल्पसंख्यांकांसाठी किंवा कुठल्याही धर्मीयांची नागरिकता हिरावून घेण्यासाठी नव्हे, तर २०१४ च्या आधीपासून  पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथील अल्पसंख्यांक शरणार्थी भारतात राहत आहेत, त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

या अभियानाची माहिती समजल्यानंतर छात्रभारतीचे कार्यकर्ते केटीएचएममध्ये दाखल झाले. त्यांनी महाविद्यालयात धर्म-जातीत तेढ पसरविणाऱ्या फलकांना विरोध केला. याविषयी प्राचार्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी लगेच धाव घेतली. महाविद्यालयाची तटस्थ भूमिका आहे. कोणाची बाजू घेत नाही. महाविद्यालयात असे काहीही चालणार नाही. महाविद्यालयाबाहेर असे कोणतेही अभियान राबवावे, असा इशारा दिल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी फलक काढून महाविद्यालयाबाहेर लावले. तिथे तासभर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आल्याचे अभाविपने म्हटले आहे. या संदर्भात प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त प्रकाराला दुजोरा दिला.

महाविद्यालय कोणाची बाजू घेत नाही. कोणतेही अभियान महाविद्यालयाबाहेर राबवावे, असे सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.

अभाविपने स्वाक्षरी मोहीम राबवितांना फलकांवर विशिष्ट धर्माचा उल्लेख केला. महाविद्यालयात जाऊन जात, धर्माचा प्रचार चुकीचा आहे. स्वाक्षरी अभियानाच्या फलकावरून मुस्लीम धर्म वगळण्यात आला आहे. भाजप या कायद्याद्वारे एका विशिष्ट समूहाला लक्ष्य करत त्यांना अलग पाडण्याचा प्रयत्न करत आहे. अभाविपने चुकीचा प्रचार थांबवावा, अन्यथा त्यांना छात्रभारती महाविद्यालयात फिरकू देणार नाही.

– समाधान बागूल  (राज्य कार्यकारिणी सदस्य, छात्रभारती)

अभाविपचे अभियान छात्रभारतीच्या काही जणांनी हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. अभाविप युवा सप्ताहानिमित्त आठवडाभरापासून महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम राबवत आहे. स्वाक्षरी अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक आणि  महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. देशाचे तुकडे करणाऱ्यांचा डाव कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही.

– अथर्व कुलकर्णी (महानगरमंत्री, अभाविप)