News Flash

शाहू महाराजांमुळे सामाजिक परिवर्तनाला गती!

सामाजिक परिवर्तनाला शाहू महाराजांनी गती प्राप्त करून दिली.

‘सावाना’ शब्द जागर उपक्र मात डॉ. मंजुश्री पवार यांचे प्रतिपादन

नाशिक : सामाजिक परिवर्तनाला शाहू महाराजांनी गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेच्या वतीने आयोजित शब्दजागर उपक्र मात डॉ. मंजुश्री पवार यांनी केले.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले.  महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणत असल्याचे सांगून डॉ. पवार म्हणाल्या, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण आणिअस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक चळवळ उभी राहिली. आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पेलली. यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले. यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:09 am

Web Title: accelerate social change shahu maharaj dr manjushri ssh 93
Next Stories
1 बाजारपेठेत गर्दीच गर्दी
2 तीन महिन्यांत ९४ लाख रुपये दंड, पण शिस्त काही लागेना
3 महापालिकेची स्पुटनिक लस खरेदी अडचणीत
Just Now!
X