अपघातात महाविद्यालयीन कर्मचारी जखमी

अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या असणाऱ्या रिक्षा, भरधाव कसरती करत निघालेली दुचाकी व चारचाकी वाहने तसेच हॉटेल, खाद्यपदार्थाच्या दुकानांतील युवा वर्गाची रस्त्यावर आलेली शेकडो वाहने.. या स्थितीमुळे उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जाणारा कॉलेज रोड धोकादायक बनला असून दिवसागणिक अपघातांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी दुपारी एसएमआरके महाविद्यालयासमोर याच महाविद्यालयातील पायी निघालेल्या कर्मचाऱ्यास भरधाव वाहनाने उडविले. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिकांसह गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनीही धसका घेतला आहे. कॉलेज रोडवर बेदरकार वाहन चालविणारे तसेच अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी पोलिसांना साकडे घातले आहे.

विविध महाविद्यालयांमुळे हा रस्ता विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुललेला असतो. त्यात काही वाहनधारकांचा तो जणू रॅलीचा मार्ग असल्याचा समज आहे. दुचाकी मोटारसायकलवर वेगवेगळ्या कसरती करणे अथवा भरधाव जाऊन मध्येच अचानक ब्रेक लावणे या प्रकारांतून लक्ष वेधण्याचे काम संबंधितांमार्फत नियमितपणे होते. त्यात भर घालण्याचे काम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गराडा घालणाऱ्या रिक्षांकडून होते. शिवाय, मार्गावरील हॉटेल्स, खाद्य पदार्थाची दुकाने व भव्य दालनांचे वाहनतळ मुख्य रस्ताच झाला आहे. या सर्वाची परिणती लहान-मोठय़ा अपघातांमध्ये होत असून या सर्वाचा नाहक जाच पायी जाणारे आणि इतरही वाहनधारकांना दररोज सहन करावा लागत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

मंगळवारी दुपारी एसएमआरके महाविद्यालयातील वासुदेव बर्वे (४०) हे कार्यालयीन कामासाठी निघाले होते. पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळले. डोक्याला मार लागल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. याच परिसरातील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती समजल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे व अन्य प्राध्यापकांनी जखमी झालेल्या बर्वे यांना रुग्णालयात दाखल केले. बुधवारी एचपीटी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्राचार्याची भेट घेऊन कॉलेज रोडवरील भीषण स्थिती कथन केली. येवलेकर मळा चौकापासून ते भोसला महाविद्यालयापर्यंतचा हा संपूर्ण मार्ग अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे.

वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी कठोर पोलिसी कारवाई न झाल्यास अपघातांची मालिका कायम राहणार असल्याकडे शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने लक्ष वेधले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनीही या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा विषय पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. काही वाहनधारक अतिशय भरधाव वाहने चालवितात. महाविद्यालय प्रवेशद्वारावर रिक्षाचालकांचाही गराडा असतो. सुरक्षित वाहतुकीसाठी तोडगा काढण्याची नितांत गरज आहे. याकरिता पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे प्रा. सूर्यवंशी यांनी सांगितले.