सिग्नल यंत्रणा बंद झाल्यानंतर अपघात, रात्री आणि पहाटे अपघातांचे प्रमाण अधिक  

नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर सिग्नल चौक रात्रीच्या सुमारास अपघातप्रवण क्षेत्र बनल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शुक्रवारी सकाळी राज्य परिवहनची बस आणि मालमोटार यांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. चौकात रात्री आणि पहाटेच्या सुमारास वारंवार अपघात होत असूनही उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

नाशिक-दिंडोरी आणि पेठ रस्ता अर्थात आरटीओकडून थेट मुंबई-आग्रा महामार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्यावर तारवालानगर चौक सिग्नल आहे. दिवसभर आणि रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असल्याने या वेळेत चौकात फारसे अपघात झालेले नाहीत. परंतु, सिग्नल यंत्रणा बंद झाली की चौकात रात्री, पहाटेच्या सुमारास अनेकदा अपघात घडल्याचे दिसून येते. काही महिन्यात पाच ते सहा अपघात झाले. नाशिक-दिंडोरी आणि आरटीओ-मुंबई-आग्रा महामार्गदरम्यानच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना रात्री चौकात पलीकडील बाजूने येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. भरधाव जाणारी वाहने चौकात परस्परांना धडकतात. शुक्रवारी पहाटे पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. बस कळवणहून नाशिककडे येत होती. महामार्ग-आरटीओ रस्त्यावरून येणाऱ्या मालमोटारीची तिला चौकात धडक बसली. या अपघातात बसमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मध्यंतरी दोन मालमोटरी चौकात धडकल्या होत्या. गुजरातहून येणाऱ्या बसला चौकात अशीच धडक बसली होती. एका अपघातात मोटारीची दुचाकीला धडक बसली होती. एका अपघातात चौकातील सिग्नल यंत्रणेचा खांब जमीनदोस्त झाला होता.  काही वर्षांपूर्वी चौकात गतिरोधक बसविलेले होते. हे गतिरोधक नियमानुसार नसल्याचे कारण देऊन पालिकेने काढून टाकले. त्यानंतर अपघातात वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मध्यंतरी नगरसेवकांनी चौकातील रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु, गतिरोधक बसविले गेले नाही. हा प्रश्न अधांतरी राहिल्याने सातत्याने अपघात थांबत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.