चार कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड व

नाशिक : वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी शहर वाहतूक पोलीस वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असून रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ही मोहीम अधिक प्रभावी करण्यात येत आहे. वाहतूक नियमांच्या पालनांसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही शहर परिसरात मागील वर्षी ५४७ अपघातांची नोंद झाली. तसेच नियमांचे उल्लंखन केल्यामुळे चार कोटी २८ लाख ४४ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे १.५ लाख लोक मृत्युमूखी पडतात. तुलनेत किंबहुना अपघातामुळे अपंगत्व येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्य़ात रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे एक हजार लोक मृत्यूमुखी पडतात. सुमारे दोन हजार लोक अपंग होतात. अपघातांची मालिका लक्षात घेता वाहतूक शहर पोलीस हेल्मेट सक्ती, सीटबेल्ट लावणे, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी न करणे यासह अन्य काही नियमांच्या अमलबजावणीसाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

शहरातील १३ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वाहतूक पोलिसांचा ताफा हे काम करतो. गर्दी किंवा आडवळणे  लक्षात घेता काही पथके या  ठिकाणी उभे राहत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत. इतक्या प्रयत्नानंतर वर्षभरात २०१८ च्या तुलनेत अपघाताचे प्रमाण घटले असल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून होत आहे. आकडेवाडीत सांगायचे तर वर्षभरात ५४७ लहान-मोठे अपघात झाले. दुसरीकडे वाहतूक पोलीस मोहिमेत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतल्यामुळे वर्षभरात वाहतूक नियमांचे भंग केल्याप्रकरणी एक लाख ७२ हजार ४४४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार कोटी २८ लाख ४४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दुसरीकडे २०१९ मोटार वाहन कायद्यान्वये एक लाख ७९ हजार ९४८ प्रकरणातून चार कोटी १९ लाख ४९ हजार ९०० रुपये तडजोड रक्कम स्विकारण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांचा मुजोरपणा आणि अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी शहर पोलिसांनी मोहीम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

नाशिक वाहतूक संघटनेतर्फे ४५ सिग्नलवर वाहतूक नियमांचे फलक

नाशिक वाहतूक संघटनेकडून रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाढते अपघात रोखण्यासाठी शहरातील ४५ सिग्नलवर प्रत्येकी चार असे वाहतूक नियमांचे फलक लावण्यात येणार आहेत. परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी भरत कळसकर, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, दिलीपसिंग बेनीवाल आदी  यावेळी उपस्थित होते. यावेळी कळसकर यांनी अपघातांच्या प्रमाणात होत असलेली वाढ चिंताजनक असून अपघात रोखण्यासाठी प्रशासनासह सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अपघातात जखमींना लवकरात लवकर मदत कशी मिळेल आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहनही  कळसकर यांनी केले.