नाशिक जिल्ह्यतील देवळा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात

नाशिक : देवळा-मालेगाव मार्गावर मंगळवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि रिक्षा यांच्यात टक्कर होऊन विचित्र अपघात झाला. ही दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून २१ जण ठार, तर ३४ जण जखमी झाले.

देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेथी फाटय़ानजीक दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर रिक्षापाठोपाठ बसही सुमारे ६० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. रिक्षातील प्रवासी बसखाली दबले गेले. सायंकाळी क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा विहिरीतून रिक्षा बाहेर काढण्यात आली. गंभीर जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या नागरिकांनी आसनांच्या सहाय्याने शिडी तयार केली. दोऱ्या बांधून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही वेळाने तीन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. बस बाहेर काढल्याशिवाय रिक्षातील प्रवाशांच्या स्थितीचा अंदाज येत नव्हता. बस इतक्या विचित्र पद्धतीने अडकली होती, की तिला बाहेर काढताना अनेक अडचणी आल्या.

या अपघातात २१ जण ठार तर ३४ जण जखमी झाले. कल्पना योगेश वन्से, शिवाजी रुपला गावित, चंद्रभागाबाई उगले, अंकुश संपत निकम, अलका दिगंबर मोरे, शीतल अमोल अहिरे, रघुनाथ मेतकत, प्रकाश बच्छाव, शांताराम चिंधा निकम या एसटीतील नऊ मृत प्रवाशांची ओळख  पटली. अजीज नथु मन्सुरी, हजराबाई अजीज मन्सुरी, अन्सारभाई मन्सुरी, शाहिस्ता शकीन मन्सुरी, शाहीन अन्सारभाई मन्सुरी, जावेद अन्सारभाई मन्सुरी, कुर्बान दादाभाई मन्सुरी, ज्ञानेश्वर शांतीलाल सुर्यवंशी आणि फारूख भिकन मन्सुरी अशी रिक्षातील मृतांची नावे आहेत.

अपघातात बसमधील जखमींमध्ये कमलबाई पवार (५०), दादाभाऊ ह्य़ाळीज (४०), धोंडू जाधव (६०), कल्पनाबाई जाधव (५०), कमल राऊत-वाहक (४२, कळवण), अमोल पाटील (३१), अनिता पाटील (२५), आयुष पाटील (५), आदित्य पाटील (साडेतीन वर्षे) आदींचा समावेश आहे. या नऊ जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात कसा?

मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील कुटुंबीय सोयरिक जुळवण्यासाठी रिक्षातून देवळा परिसरात आले होते. ते परत मालेगावकडे रिक्षाने निघाले असताना मालेगावकडून कळवणकडे जाणाऱ्या भरधाव बसने रिक्षाला टक्कर दिली. ती इतकी जोरदार होती की दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.