विभागीय नियंत्रकाचा कर्मचाऱ्यांना इशारा; शिंदे, पळसेतील विद्यार्थ्यांसाठी सिन्नर आगारातून चार गाडय़ा

पुणे महामार्गावरील नाशिकरोडलगतच्या शिंदे, पळसेसह पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी बसगाडय़ा न थांबविल्यास त्या बस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सिन्नर आगारातून चार नवीन गाडय़ा सकाळच्या वेळेत सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अनेक दिवसांपासून शिंदे, पळसे, नानेगाव, जाखोरी व नायगांव येथील बससेवा बंद करण्यात आल्याने इतरांसह विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. पळसे, शिंदे या प्रमुख थांब्यांवर बस थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या संबंधित कार्यालयाकडे केलेली असतानाही त्यावर कोणतीही उपाययोजना कार्यालयाने केली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पळसे येथे पुणे महामार्गावर बस रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर आ. योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांची भेट घेत त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. पुढील काळात कुठल्याही बस थांब्यावर बस न थांबल्यास राज्य परिवहनविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

बैठकीत जोशी यांनी अनंत चतुर्दशीनंतर ग्रामीण भागातील सर्वच प्रमुख थांब्यांवर बस थांबतील अशी प्राधान्याने व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शिंदे, पळसे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शिंदे बस थांब्यावर आठवडय़ात दोन दिवस पास केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांचा पासचा प्रश्न सोडविला जाईल, तसेच पळसे बस थांब्यावर एका वाहतूक नियंत्रकाची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आजपासूनच सिन्नर डेपोतून नवीन चार वाढीव बसेस सकाळी ६ ते ८ या शाळा कॉलेजच्या वेळेत सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय जे वाहक-चालक बसेस थांबवणार नाहीत त्यांचे नावे व बस क्रमांक कार्यालयाला कळविल्यास त्वरित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासन जोशी यांनी दिले आहे. बैठकीस विद्यार्थी सेनेचे राहुल धात्रक, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, नवनाथ गायधनी आदी उपस्थित होते.

बससेवा सुरू करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांनी बैठकीत सिन्नर आगारातून नव्याने वाढीव चार बसगाडय़ा सकाळच्या वेळेत सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहनचालकांनी वरिष्ठांनी सूचना करूनही बस न थांबविल्यास आपण स्वत: विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करणार आहोत.  आ. योगेश घोलप