News Flash

भद्रकालीत अतिक्रमण निर्मूलनाचा देखावा

अतिक्रमण निर्मूलन पथकावर व्यावसायिकांनी दगडफेक केली.

भद्रकाली परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना पथकाने दुजाभाव केला. नगरसेवक सुफी जीन यांच्या संपर्क कार्यालयाच्या ओटय़ाला हात न लावता त्या समोरील ओटा मात्र जमीनदोस्त करण्यात आला.
  • नगरसेवकासह बडय़ांना अभय तर इतरांवर हातोडा
  • पथकावर दगडफेक

गेल्या काही दिवसांपासून धडकपणे राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गुरुवारी भद्रकाली परिसरात हिंसक वळण लागले. अतिक्रमण निर्मूलन पथकावर व्यावसायिकांनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत पथकाकडील वाहनाचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. या घडामोडीनंतर अतिक्रमण निर्मूलनाचे काम सुरू ठेवण्यात आले. यावेळी पथकाने अतिक्रमण हटवताना दुजाभाव केला. अनधिकृत पक्क्या स्वरूपाची बांधकामे न तोडता केवळ दुकानासमोरील ओटे व शेडसारखी अतिक्रमणे हटविण्यात धन्यता मानल्याचा स्थानिक नागरिकांचा आक्षेप आहे. त्यातही काहींच्या अतिक्रमणांना अभय दिल्याचा सूर उमटला.

मागील आठवडय़ात अतिक्रमण निर्मूलन विभागाने बांधकाम व्यावसायिकाच्या तीन मजली इमारतीवर हातोडा मारल्यानंतर नगरसेवकांच्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच गुरुवारी या विभागाने अतिशय गजबजलेल्या भद्रकाली परिसराकडे आपला मोर्चा वळवला. अल्पसंख्याकबहुल असणाऱ्या या भागात दूध, भाजीपाला, फळे, हॉटेल्स, लोखंड व तत्सम स्वरूपाची अनेक दुकाने आहेत. तसेच याच ठिकाणी महापालिकेचे खोका मार्केट आहे. या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यापारी हे स्थानिक रहिवासी आहेत. सर्वात जुनी बाजारपेठ अशी या बाजारपेठेची ओळख आहे. सकाळी महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात अचानक दाखल झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. व्यापाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता पथकाने जेसीबीच्या साहाय्याने टपऱ्यांसमोरील पत्रे काढण्यास सुरुवात केली. यामुळे टपऱ्यांसह शेडचे नुकसान झाले. या घडामोडींमुळे व्यापारी संतप्त झाले. परिसरात मोठा जमाव जमला. काहींनी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या गाडय़ांवर दगडफेक सुरू केली. त्यात काही गाडय़ांच्या काचा फुटल्या. दगडफेक सुरू झाल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी धरपकड सुरू केल्यावर अनेकांनी पळ काढला. काही काळाच्या विश्रांतीनंतर पथकाने थेट सारडा सर्कल परिसरापर्यंत मोहीम राबविली. परंतु, त्यात दुजाभाव करण्यात आल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. काही ठिकाणी परिसरातील नागरिकांचे, व्यावसायिकांचे ओटे तोडण्यात आले तर काही ठिकाणी केवळ शेड काढून समज दिली गेली. परिसरातील नगरसेवक सुफी जीन यांच्या संपर्क कार्यालयासमोरील अनधिकृत ओटा काढण्याऐवजी केवळ फलक काढला गेला, तर त्याच समोर असलेला ओटा पूर्णत: तोडण्यात आला.

हाजी चहाच्या टपरीचे अतिक्रमण तसेच ठेवत शेजारील बांधकाम तोडण्यात आले. मोहिमेतील या दुजाभावाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकावर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी २० हून अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवले. महापालिकेकडून नुकसान भरपाई वसुलीची मागणी करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 3:33 am

Web Title: action against illegal construction in bhadrakali
Next Stories
1 पाण्यासाठी लासलगावमध्ये बंद
2 विद्यार्थी वाहतुकीसाठी एसटीच्या ८६४ फेऱ्या
3 वन महोत्सवासाठी महापालिकेचा मदतीचा हात
Just Now!
X