सायंकाळपर्यंत ६० जणांना दंड

मध्यवर्ती भागातील रस्त्यावर अस्त्याव्यस्तपणे उभ्या करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांवर कारवाईचे सत्र दुसऱ्या दिवशी शहरातील इतर भागापर्यंत विस्तारण्यात आले. रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, मेनरोड, सीबीएस, न्यायालय व जिल्हाधिकारी परिसर, शालिमार या भागात सायंकाळपर्यंत ६० बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मध्यवर्ती बाजारपेठेचा परिसर असणारा रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, टिळकपथ व शालिमार हा परिसर सदैव वाहतूक कोंडीत गुरफटलेला असतो. अरुंद रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जातात. या परिसरात नो-पार्किंगमध्ये उभ्या करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कारवाई होते; परंतु वाहतूक कोंडीचे कारण ठरलेल्या चारचाकी वाहन चालकांवर कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी वाहतूक पोलिसांनी अकस्मात ‘नो-पार्किंग’मध्ये वाहन उभ्या केल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. पहिल्या दिवशी महात्मा गांधी रस्त्यावर बेशिस्त पद्धतीने लावण्यात आलेल्या चारचाकी वाहनांना ‘जॅमर’ बसविण्याचे काम सुरू झाले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. गुरुवारी उशिरापर्यंत या एकाच भागात ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईसाठी मोठा पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. रस्त्यावर कोणतेही वाहन उभे राहू नये याकरिता ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात आल्या. शुक्रवारी सकाळपासून या कारवाईचा विस्तार करण्यात आला. रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, मेनरोड, सीबीएस, न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील परिसर, शालिमार या ठिकाणी पोलीस रस्त्यावर उतरले. ‘नो-पार्किंग’मध्ये वाहन उभे केल्यास तातडीने कारवाई केली जात होती. सायंकाळपर्यंत ६० हून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पुढील काही दिवसांत शहरातील सातपूर, कॉलेजरोड, नाशिकरोड, पंचवटीसह अन्य भागातील मुख्य रस्त्यांवर ही कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईला स्थानिक व्यावसायिक व काही वाहनचालकांनी विरोध सुरू केला आहे. कारवाई करतेवेळी वाहनचालक पोलिसांशी हुज्जत घालतात.

संबंधितांकडून आडमुठी भूमिका घेतली जाते. वाहने उभी करू दिली जात नसल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. मुळात रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजतात. त्याचा त्रास पादचारी व शालेय विद्यार्थी व अन्य वाहनधारकांना सहन करावा लागतो. मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीला रस्त्यावर उभी राहणारी वाहने व फळ विक्रेत्यांच्या हातगाडय़ा प्रामुख्याने कारणीभूत आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे मध्यवर्ती भागातील रस्ते मोकळा श्वास घेऊ लागल्याचे चित्र आहे; परंतु हे रस्ते किती दिवस असे राहतील, याबद्दल नागरिकांना साशंकता आहे. यापूर्वी या स्वरूपाच्या अनेक मोहिमा राबविल्या गेल्या; परंतु नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे त्यांचे स्वरूप राहिले. परिणामी, काही दिवसांनी या रस्त्यांवर पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. दुसरीकडे कारवाई करण्याची वेळ येऊ नये म्हणून वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्वयंशिस्त महत्त्वाची

शहर वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुरू राहतील. पण वाहनचालकांनी ‘स्वयंशिस्त’ पाळणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी एखादी मोहीम आखत त्यासाठी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरवत तेथील प्रश्न सोडवावा, तोच प्रश्न शहरात दुसऱ्या ठिकाणी गुंतागुंतीचा असतो. व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करत आहे, दुसरीकडे वाहन लावण्यावरून पोलिसांशी वाद घालत आहे. पोलिसांना प्रत्येक वेळी कारवाई शक्य असेल असे नाही.  लक्ष्मीकांत पाटील (शहर वाहतूक शाखा, उपायुक्त)