विनयनगर परिसरात घडलेली दंगल तसेच सिडकोतील दुचाकी जाळण्याचा प्रकार या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी झोपडपट्टी परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत हॉटेल व निवारागृहांची छाननी केली जात आहे.

परिमंडल दोनच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकांनी एकूण ४२ गुन्हेगारांवर कारवाई केली. चोरीला गेलेल्या दुचाकींचाही या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला वेळीच पायबंद घालण्याच्या उद्देशाने सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी रात्री सुरू झालेली ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होती. त्या अंतर्गत अनेक ठिकाणी छापे टाकून गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाईत ३० संशयितांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी १३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली तर १७ जणांचा शोध सुरू आहे. या शिवाय काही अनैतिक व्यवसायासह अवैध धंदे सुरू आहेत का, याची चाचपणी करण्यासाठी सहा हॉटेल व सहा निवारागृहांची तपासणी करण्यात आली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० संशयितांची चौकशी करून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा परिसर कायम चर्चेत असतो. वडाळा गाव झोपडपट्टी परिसरात केलेल्या धडक कारवाईत सात संशयितांना पकडण्यात आले. तडीपार करण्यात आलेल्या ४ संशयितांच्या घराची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत चोरीला गेलेल्या वाहनांची छाननी केली जात आहे. परिसरात चोरीची वाहने नाहीत ना यासाठी ३० वाहनांची तपासी करण्यात आली. त्यात तीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

उपनगर परिसरातील सात झोपडपट्टी आणि मळा परिसरातील कारवाईत ४ संशयित पथकाच्या हाती लागले. त्यातील एक अजामीनपात्र गुन्हेगाराचा समावेश असून परिसरातील ३० वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्यात आली. १२ संशयित वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतही टवाळखोर, संशयित वाहनचालक, गुन्हेगार आदींचा शोध घेऊन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. इतर फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत आहे. रविवारी विनयनगर परिसरात जागेच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची तक्रार होती.