नागरिकांमध्ये अस्वस्थता; आयुक्तांना साकडे

नाशिक : शहरात करवाढीच्या मुद्यांवरून नाशिककरांमध्ये असंतोष असतांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील वाढीव अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली आहे. अशा बांधकामांना रेखांकित करण्याची मोहीम सध्या सुरू असून नागरिकांमध्ये अस्वस्थता  आहे.  दोन दिवसांत सिडकोच्या २४ हजारपैकी ५०० घरांवर कारवाईसाठी रेखांकन करण्यात आले आहे.  या मोहिमेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

सिडकोतील अतिक्रमणाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेत असतांना अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पूर्वसूचना न देता मंगळवारी रेखांकन मोहिमेला सुरुवात झाली. अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या हातात असलेले साहित्य पाहून नागरिक धास्तावले. त्यात हे घर पाडायचे असल्याने याच्यावर निशाणी करा, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येऊ लागल्याने  नागरिकांचा संयम सुटला. नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत या सर्व प्रकाराचा जाब विचारल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी रेखांकन करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने बुधवारी राजरत्ननगर परिसर, महाकाली चौक, साईबाबा नगर परिसरात रेखांकन करण्यात आले. मंगळवारचा अनुभव लक्षात घेता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेची माहिती देत तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन  काम सुरू ठेवल्याने नागरिकांनी सहकार्य केले. मोहीम सुरू असतांना सीमा हिरे, अपूर्व हिरे या दोन आमदारांनी नागरिकांची भेट घेत या विषयावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, राजकीय श्रेयवादाच्या लढय़ात न उतरता नागरिकांनी स्वतंत्रपणे हा लढा लढण्याचे ठरविले आहे. या संदर्भात बुधवारी सिडको परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्याआधी चौक सभा घेत अतिक्रमणाबाबत प्रशासनाची भूमिका समजून घेतले. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला विरोध नाही. घरे बांधतांना अनेकांनी महापालिकेकडून अधिकृत परवानगी घेतली आहे. काहीनी ही परवानगी घेतली नाही. वाढीव बांधकामाचा वापर केवळ निवासासाठी होत आहे. तसेच या वाढीव बांधकामाचा वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा होत नसल्याचा दावा नागरिकांनी केला.

महापालिकेने सर्वेक्षण करत नाल्यावरील बांधकाम, वाहतुकीस अडथळा होणारे वाढीव बांधकाम काढून घ्यावे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर वाहतुकीला अडथळा न होणारे वाढीव बांधकाम नियमीत करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

तक्रारी असलेल्या भागांचे रेखांकन आधी

सिडकोत अतिक्रमणातील सर्वच घरांचे रेखांकन करण्याचा वरिष्ठांचा आदेश आहे. पहिल्या टप्प्यात साईबाबा नगर, महाकाली चौक, ब्रह्मगिरी चौक, लोकमान्य नगर, पंडित नगर, शिवपुरी चौक आदी ठिकाणाहून अतिक्रमणविषयक तक्रारी अधिक असल्याने तेथील रेखांकन आधी करण्यात येणार आहे. नागरिकांचा विरोध असला तरी पोलीस बंदोबस्ताशिवाय मोहीम सुरू असून नागरिकांना विश्वासात घेत काम सुरू आहे.

 -सुनीता कुमावत, सिडको, विभागीय अधिकारी