महापालिकेकडून एक कोटीची वसुली; दोन हजार घरमालकांच्या जोडण्या तीन आठवडय़ात अधिकृत
महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहरातील अनधिकृत नळ जोडणीधारक आता आपल्या जोडण्या अधिकृत करण्यास पुढे सरसावत असून तीन आठवडय़ात बारा हजारापैकी दोन हजार घरमालकांनी आपल्या नळजोडण्या अधिकृत करून घेतल्या आहेत. त्याद्वारे पालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटीहून अधिक महसूल जमा झाला असून त्यामुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे अधोरेखित होत आहे.
हद्दवाढीनंतर पालिकेच्या दप्तरी अधिकृतरीत्या नळजोडणीधारकांची संख्या ५३ हजारांपर्यंत गेली होती. सात लाख लोकसंख्या आणि एक लाखाहून अधिक मालमत्ताधारक असलेल्या शहरातील नळधारकांची संख्या इतकी कमी असू शकत नाही आणि मोठय़ा प्रमाणावर असलेल्या अनधिकृत नळ जोडण्यांचा तो परिपाक असल्याचे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या फार पूर्वीच लक्षात आले होते. या अनधिकृत जोडण्यांमुळे पाणीपट्टी रूपाने येणाऱ्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागत होते. सतत आर्थिक संकटाचा मुकाबला करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या दृष्टीने ही फारच चिंतेची बाब होती. त्यामुळे अनधिकृत नळ जोडणीधारकांवर कारवाई करण्याचा प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्नही केला. मात्र त्यास यश आले नव्हते. मध्यंतरी प्रशासनाने एका खासगी संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणातून शहरात साधारणत: बारा हजार अनधिकृत नळजोडणीधारक असल्याची बाब समोर आली होती. महासभेतही या जोडण्या कायम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर, नव्याने आलेले आयुक्त किशोर बोर्डे यांनी या प्रश्नी ठोस मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन उपायुक्त, शहर अभियंता व उपअभियंता यांच्या नेतृत्वाखाली चार प्रभागांसाठी स्थापन करण्यात आलेल्या चार पथकांद्वारे २ जानेवारीपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यात पोलीस बंदोबस्तात अनधिकृत जोडण्या खंडित करण्यात येत आहे.
कारवाईदरम्यान अनधिकृत नळधारकाने दंडात्मक रक्कम, अनामत आदी खर्च भरण्याची तयारी दर्शविल्यास त्याची जोडणी अधिकृत केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून तीन आठवडय़ांत दोन हजारावर मालमत्ताधारकांनी रक्कम भरून आपल्या नळजोडण्या अधिकृत करून घेतल्या आहेत. त्यापोटी पालिकेला एक कोटीहून अधिक महसूल प्राप्त झाला आहे.
पुढील दोन महिने ही कारवाई सुरूच राहणार असून त्यातून पाच कोटी महसूल जमा होण्याचे प्रशासनाला अपेक्षित आहे. सामान्य नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.