शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने राजकीय पक्षांसह सर्वच नाशिककरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जाग आलेल्या पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले. त्याअंतर्गत बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील ३० महत्त्वाच्या ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी २६४ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत १२ रिक्षा जमा केल्या.

खून, रस्त्यात धाक दाखवून लूट, मंगळसूत्र खेचणे यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नाशिककर हैराण झाले आहेत. शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होऊनही पोलीस ढिम्म असल्याने नाशिककरांनी पोलीस आयुक्तांना लक्ष करणे सुरू केले. याआधीच्या पोलीस आयुक्तांची कामगिरी आणि विद्यमान आयुक्तांची कामगिरी यांची तुलना होऊ लागल्याने पोलिसांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली.

राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेना, भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही आयुक्तांना गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन केल्यानंतर जाग आलेल्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्याअंतर्गत बुधवारी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक कोंडी होणाऱ्या व रहदारीस अडथळा येणाऱ्या महत्वाच्या ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली. नाकाबंदी करून बेशिस्त रिक्षाचालक, दुचाकी चालकांकडील वाहनांसंबंधीचे कागदपत्र, गणवेश यांची तपासणी करण्यात आली. पुढील सीटवर प्रवासी बसविणाऱ्या रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखा तसेच पोलीस ठाण्यांकडील  अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानुसार शहरात नाकाबंदीसाठी महत्वाची ३० ठिकाणे निवडण्यात आली.

या ठिकाणांवर शहर वाहतूक शाखेकडील सात पोलीस अधिकारी व ५८ कर्मचारी नेमण्यात आले होते. नाकाबंदीदरम्यान ७८ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून १२ रिक्षा जमा करण्यात आल्या. तसेच सर्व पोलीस ठाण्यांकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २६४ वाहनधारकांवर कारवाई केली आहे.