25 February 2021

News Flash

दुकानांवर कारवाईचा बडगा

शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने सोमवारपासून रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली.

सारडा चौक परिसरात पंक्चर काढण्याच्या दुकानात मुखपट्टी परिधान न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

हॉटेल, मंगल कार्यालयांवरही नजर, मुखपट्टी न वापरणाऱ्यांच्या विरोधातही कारवा

नाशिक : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. महापालिकेच्या पथकांनी सारडा चौक परिसरातील दुकानदारांविरोधात कारवाई केली. दुसऱ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित ठिकाण १० दिवस बंद करण्याचा इशारा देण्यात आला. धडकपणे सुरू झालेल्या कारवाईमुळे व्यावसायिक धास्तावले असून काही महिन्यात विसर पडलेल्या नियमांच्या अमलबजावणीकडे लक्ष दिले जाऊ लागले आहे. दुपारपर्यंत मुखपट्टी न वापरण्याच्या २२६ प्रकरणात ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने सोमवारपासून रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली. गोरज मुहूर्तावर लग्न सोहळ्यांचे आयोजन करू नये, अशी सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध एक हजार रुपये दंड आणि ज्या दुकानात सुरक्षित अंतराचे पथ्य, हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर आदी नियमांचे पालन होत नसेल, त्यांच्याविरुध्द कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे.

मुखपट्टी केवळ जवळ बाळगून त्याचा वापर न करणे अथवा योग्य रीतीने न वापरणे हे देखील मुखपट्टीचा वापर न करणे समजले जाणार आहे. विवाह सोहळ्यात १०० व्यक्तींना उपस्थितीची परवानगी आहे. शहरातील हॉल, मंगल कार्यालयांत कोणतेही कार्यक्रम आयोजित करताना उपस्थिती नियमानुसार मर्यादित ठेवण्याचे सूचित करण्यात आले. या घटनाक्रमामुळे सुस्तावलेल्या यंत्रणाही नव्याने कार्यप्रवण झाल्या आहेत.

महापालिकेच्या पथकांनी गर्दी होणारी दुकाने, हॉटेल, बस स्थानक आदी ठिकाणांकडे मोर्चा वळविला आहे. सुनील शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सारडा चौक परिसरात अनेक दुकानांवर कारवाई केली.

या परिसरात वाहनांचे सुटे भाग, टायर, मार्बलच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. वाहनांचे सुटे भाग घेण्यासाठी एका दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. तिथे सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले जात नव्हते. संबंधितास पाच हजाराचा दंड करण्यात आला. टायर विक्री, पंक्चरचे दुकान आणि मार्बलच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी परिधान केलेली नसल्याचे आढळले. संबधितांना प्रत्येकी हजार रुपये यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. सायंकाळी हॉटेल, मॉल्स आणि मंगल कार्यालयातील गर्दीची छाननी करून कारवाईचे संकेत देण्यात आले.

कारवाई झालेल्या दुकानांमध्ये पुन्हा नियम पाळले गेले नाही तर ५० हजार रुपये दंड, १० दिवस दुकान बंद ठेवण्यासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अरेरावी, हुज्जत अन् कारणे…

नियमांचे पालन न करणारे काही जण पालिकेच्या पथकांना अरेरावी, दमदाटी करतात. त्यामुळे गरज भासल्यास पथकांकडून पोलिसांना मदतीसाठी बोलाविले जाते. कारवाईवेळी विविध कारणे पुढे केली जातात. कठोर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा त्याची अनुभूती पथकांना आली. मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांनी कुठे आहे करोना, असे प्रश्न उपस्थित केले. कोणी अरेरावीची भाषा करत ‘दंड भरणार नाही, काय करायचे ते करा’ अशी ताठर भूमिका घेतली. कोणी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. काहींनी आताच मुखपट्टी काढली, असेही कारण पुढे केले. परंतु, कारवाईआधी पथकांनी संबंधितांचे छायाचित्र टिपले होते. काहींचे छायाचित्रणही करण्यात आले. त्याची कल्पना दिल्यावर संबंधितांना प्रतिवाद करता आला नाही. दुकानांवरील कारवाईवेळी व्यापाऱ्यांनी नियमावली माहिती नसल्याचे कारण पुढे केले. त्यांना नियमावली आणि पुन्हा असे घडल्यास काय होईल याची जाणीव करून देण्यात आली.

गुजरातच्या बसचालकावर कारवाई, दोन प्रवासी पसार

महामार्ग बसस्थानकातगुजरात महामंडळाच्या बसमधील चालक आणि काही प्रवाशांनी मुखपट्टी परिधान केलेली नव्हती. पथकाने संबंधितांकडे विचारणा केली. संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईच्या धास्तीने मुखपट्टी परिधान न केलेल्या दोन प्रवाशांनी बसमधून पलायन केले. त्यांचा पथकातील कर्मचारी, बिट मार्शलने पाठलाग केला. परंतु, ते सापडले नाहीत. मुखपट्टी परिधान न केलेल्या त्या प्रवाशांची छायाचित्रे आधीच टिपण्यात आली आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:36 am

Web Title: action on shops hotel office corona virus infection akp 94
Next Stories
1 मालेगावमधील मालमत्ता सर्वेक्षणास भाजपचा आक्षेप
2 मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात घसरण
3 छगन भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्यांचीही करोना चाचणी
Just Now!
X