कुंभमेळ्यात हिंदू धर्माला कलंकीत करणाऱ्या भोंदू साधू-बाबांना रोखण्यासाठी याच सिंहस्थ पर्वात हिंदू संघटनांचे संघटीत आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी दिली.
पुरातन काळापासून हिंदू धर्म संस्कृतीत साधू-संतांना आदराचे स्थान आहे. मात्र गेल्या काही वर्षांत धर्म संस्थेत काही भ्रष्टाचारी, स्वार्थी आणि लोभी व्यक्तींचा शिरकाव झाला. विविध माध्यमातून त्यांनी भाविकांची अडवणूक सुरू केली आहे. विद्यमान ‘राधे मॉ’ हे त्याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येईल. अशा तथाकथीत साधू-संताच्या वर्तनाने हिंदू धर्म टिंगलटवाळणीचे कारण बनत आहे. तसेच अन्य धर्मीयांना तसेच धर्मद्रोही नास्तिकवादी यांना हिंदू धर्मावर टीका करण्याची संधी मिळते. हे लक्षात घेऊन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने नाशिकच्या कुंभमेळ्यापासून समविचारी हिंदू संघटनांच्या सोबतीने भोंदु बाबांना रोखण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पर्वणी काळात भोंदू साधू-संत आढळल्यास त्यांचा संबंधित आखाडा तसेच आखाडा परिषद यांच्याकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे यासाठी समिती आखाडा परिषदेकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच पैशांच्या मागणीसाठी धमकी देणाऱ्या साधू-बाबांवर पोलिसात तक्रार नोंदविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांसाठी इ मेलच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध रहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती संस्थेने केले आहे.